मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या उसाचे प्रतिटन २८०० रुपयांप्रमाणे बिल जमा केला आहे.
ज्या शेतकऱ्यांची उर्वरित ऊस बिलाची रक्कम देणे राहिली होती ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सांगितले.
दरम्यान, मार्गदर्शक संचालक खासदार धनंजय महाडिक यांच्या सूचनेनुसार गत वर्षीच्या गाळप झालेल्या उसाला वाढीव शंभर रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. यामुळे भीमा साखर कारखान्याचा गत वर्षीचा अंतिम दर आता २९०० रुपये झाला आहे.
भीमा कारखान्याकडे गत हंगामात गाळपास आलेल्या उसाची साधारण तीन कोटी ५२ लाख १७ हजार १७५ रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना देणे होती. ही सर्व रक्कम धनश्री पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे चेअरमन महाडिक यांनी सांगितले.
भीमा कारखान्याकडे इथेनॉल आणि डिस्टिलरी प्रकल्प नसूनही भीमाने आजवर उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर दिला आहे.
या हंगामातही भीमा कारखाना गाळपास येणाऱ्या उसाला सर्वांच्या बरोबरीने दर देण्यास कटिबद्ध असल्याचा विश्वास चेअरमन विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक खालीद शेख, संचालक मंडळ उपस्थित होते.
अधिक वाचा: नवीन गाळप हंगामाचे धोरण ठरले; यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी कसा मिळणार दर?