सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथील मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याकडून देय असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची ११ कोटी रक्कम दोन दिवसात बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मालकीचा रुद्देवाडी येथील मातोश्री लक्ष्मी शुगर हा कारखाना नुकताच ओंकार पावर कार्पोरेशन कंपनीने घेतला आहे.
साखर उद्योगातील बाबुराव बोत्रे पाटील यांच्या व्यवस्थापनाखाली यापुढे हा साखर कारखाना चालवण्यात येणार आहे. कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने गेल्या काही वर्षात गाळप केलेल्या ऊस बिलाची रक्कम उत्पादकांना देता आली नव्हती.
ओंकार पावर कॉर्पोरेशनने मातोश्री लक्ष्मी शुगरचा ताबा घेतला असून यंदाच्या गळीत हंगामासाठी यंत्रसामग्रीची दुरुस्ती, तोडणी आणि वाहतूक यंत्रणा या बाबींची पूर्तता करीत कारखाना गाळपासाठी सज्ज करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम थकीत असल्याने साखर आयुक्तालयाकडे गाळप परवान्यासाठी अर्ज करण्यात आला नव्हता.
आता कारखान्याने तांत्रिक बाबींची पूर्तता करून गाळपाची तयारी केली आहे. सोमवारी नव्या व्यवस्थापनाने मोळी पूजन करून चाचणी घेतली आहे. मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याचा वाद एनसीएलटी (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरण) मध्ये गेला होता.
ओंकार ग्रुपने हा कारखाना विकत घेतला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. न्यायाधीकरणाच्या आदेशानुसार देय असलेल्या रकमा देण्यास प्रारंभ झाला आहे.
तीन वर्षांपूर्वीची एफआरपी जमा
◼️ मातोश्री लक्ष्मी शुगरची तीन वर्षांपूर्वीची (सन २०२२-२३) शासकीय नियमानुसार एफआरपीची १८५८ रुपये प्रति टनप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती ओंकार शुगरच्या वतीने देण्यात आली आहे.
◼️ उर्वरित रकमा शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांना अदा केल्या जातील, त्याचबरोबर वाहतूक आणि तोडणी यंत्रणेच्या रकमाही देणार असल्याचे सांगण्यात आले.
अधिक वाचा: १२९ कारखान्यांकडे २ हजार कोटी 'एफआरपी' थकीत; एकरकमी एफआरपीसाठी १७ डिसेंबरला सुनावणी
