कोल्हापूर : राज्यात कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी संपला आहे. या कालावधीत राज्यातील १८४ खासगी साखर व सहकारी साखर कारखान्यांनी तीन कोटी ६७ लाख ९० हजार टनांचे गाळप केले आहे.
यामध्ये साखर उताऱ्यात कोल्हापूर विभागच भारी ठरत असून, सरासरी ९.७५ टक्के उतारा सुरुवातीलाच कायम राखला आहे.
मात्र, गाळपात पुणे विभाग पुढे असून, त्यांनी ८६ लाख ७१ हजार टनांचे गाळप केले आहे. सर्वाधिक गाळप बारामती ॲग्रोचे असून, त्यांनी ९ लाख ४२ हजार टन ऊस गाळप केला आहे.
किती क्विंटल साखर उत्पादन?
◼️ यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हंगाम सुरू झाला.
◼️ गेल्या दीड महिन्यात १८४ साखर कारखान्यांनी तीन कोटी ६७ लाख टन उसाचे गाळप करून तीन कोटी सात लाख ४६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
◼️ पुणे विभागात २९ साखर कारखाने आहेत, त्यांनी सर्वाधिक ८६ लाख ७१ हजार टनांचे गाळप केले आहे.
◼️ त्या तुलनेत कोल्हापूर विभागात ३५ साखर कारखाने असूनही यंदा गाळपात मागे राहिला आहे.
◼️ गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ डिसेंबर अखेर एक कोटी ६२ लाख टनाने गाळप अधिक झाले आहे.
गाळपात राज्यातील पहिले ५ साखर कारखाने
१) बारामती ॲग्रो, पुणे - ९ लाख ४२ हजार.
२) दौंड शुगर, पुणे - ७ लाख ८९ हजार.
३) कल्लाप्पाण्णा आवाडे, हुपरी - ५ लाख ८९ हजार.
४) तात्यासाहेब कोरे, वारणा - ५ लाख ५७ हजार.
५) दत्त, शिरोळ - ४ लाख २५ हजार.
तुलनात्मक हंगाम (१५ डिसेंबर अखेर)
हंगाम : २०२४-२५ : २०२५-२६
सहकारी कारखाने : ९५ : ९१
खासगी कारखाने : ९६ : ९३
एकूण गाळप टन : २.५ कोटी : ३.६७ कोटी
सरासरी उतारा : ८.०३% : ८.३६%
अधिक वाचा: ऊस दराच्या संघर्षाला यश; आता कारखान्याचा काटा कधी थांबवणार शेतकऱ्यांच्या घाटा?
