सरवडे : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामासाठी प्रतिटन ३४५२ रु. प्रमाणे विनाकपात पहिली उचल देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली.
पहिली उचल हा अंतिम ऊस दर नाही, असेही त्यांनी सांगितले. कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खते, औषधे, इंधन आदींचे दर प्रचंड वाढले असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे साखरेचा हमीभाव वाढविणे आणि शेतकऱ्यांच्या उसास योग्य दर देणे काळाची गरज आहे.
बिद्री साखर कारखान्याने नेहमीच काटकसरीचे धोरण अवलंबून, शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
या हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास प्रतिमेट्रिक टन रु. ३४५२ प्रमाणे विनाकपात पहिली उचल देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला असून, हंगाम समाप्तीनंतर शासन नियमाप्रमाणे सरासरी साखर उताऱ्यानुसार अंतिम ऊसदर दिला जाईल.
विस्तारीकरणानंतर कारखाना प्रतिदिन ८ हजार ५०० मेट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप करण्यास सज्ज आहे. चालू गळीत हंगामासाठी 'बिद्री'ची तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून, कार्यक्षेत्रातील गावागावांत मजूर टोळ्या व ऊसतोडणी यंत्रे दाखल झाली आहेत.
व्यवस्थापनाने ठरविलेले १० लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट गाठण्यासाठी सर्व ऊसउत्पादकांनी ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष मनोज फराकटे, सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे, तसेच सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
अधिक वाचा: उसतोड मशीन संघटनेच्या 'या' मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास १ नोव्हेंबरपासून ऊस तोडणी बंद
