सोलापूर : महिलांच्याशेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता बचत गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृद्ध होण्यासाठी उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यरत आहे.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, टेक्नोसर्व्ह आणि केडी एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील साऊली शेतकरी महिला उत्पादक कंपनीने २१ केळी इराण येथे निर्यात केली.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या साऊली महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने २१ टन केळी ही इराण या देशात निर्यात करण्यात आली.
यावेळी उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, टेक्नोसर्व्हचे मृत्युंजय, चंद्रवीर, केडी एक्सपोर्टचे किरण डोके, तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख, सुषमा बिचुकले, साऊली शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक प्राजक्ता पोरे, दीपाली पंढरे, सुवर्णा खबाले, मुक्ता सोमासे, तबस्सुम शेख, मनिषा बोराडे उपस्थित होत्या.
केळी प्रक्रियासाठी आणखी मदत मिळणार
◼️ महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे. तसेच, साऊली महिला शेतकरी उत्पादक कंपनीला मूल्यवर्धन साखळी अंतर्गत केळी प्रक्रिया उद्योगासाठी प्रकल्प मंजूर आहे.
◼️ तसेच, स्मार्ट प्रकल्पअंतर्गत या कंपनीचा प्रकल्प राज्य कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, तो मंजूर झाल्यास केळी प्रक्रियासाठी आणखी मदत मिळून कंपनीच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी मोठे व्यासपीठ मिळणार आहे.
महिला बचत गटाच्या महिलांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने शेतमालाची होत असलेली निर्यात ही निश्चित प्रेरणादायी आहे. भविष्यात आणखीन नवनवे उपक्रम, योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. - संदीप कोहिणकर, अति. सीईओ, जिल्हा परिषद
अधिक वाचा: आता राज्यातील ग्रामपंचायतींना ५ कोटी जिंकण्याची संधी; शासन सुरु करतंय 'हे' अभियान