सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे: पन्हाळा तालुक्यातील डोंगराकडेच्या शेतात गव्यांचे कळप धुमाकूळ घालून पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
परंतु, निकमवाडी येथील गोरख निकम या शेतकऱ्याने जुगाड बनवून गव्यापासून हिरव्यागार शाळू पिकाचे संरक्षण केल्याने गव्यांचा कायमचा बंदोबस्त केला आहे.
आजूबाजूच्या पिकांचे गवे नुकसान करत असले तरी गेले सात वर्षात गोरख यांच्या एकरातील शाळू पिकात गवे फिरकलेले नाहीत.
पन्हाळागडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलात गव्यांचा कळप आहे. गवे अन्नपाण्याच्या शोधात रात्री-अपरात्री डोंगराकडेच्या पिकांची नासधूस करीत आहेत.
या गव्यांना रोखण्यात वनविभागाला अपयश येत आहे. त्यामुळे शेतकरी रात्री जीव धोक्यात घालून पिकांची राखण करतात.
निकमवाडीतील गोरख निकम या शेतकऱ्याने गव्यापासून शेताची किती दिवस राखण करायची म्हणून डोके चालवून गव्यांचा कायमचा बंदोबस्त करणारे जुगाड बनवून गव्यापासून पिकाचे संरक्षण केले आहे.
असे बनविले जुगाड
- एक हजार फुटावरून शेतात वीज आणली आहे.
- रात्री लख प्रकाशासाठी दोन हॅलोजन खोपीला बसविले असून, ते चालू-बंद स्थितीत आहेत.
- झाडाच्या फांदीला दोरी बांधून, दोरीला दोन बॅटऱ्या बांधल्या आहेत.
- वारा आला की बॅटरी गोल गोल फिरत राहिल्याने बॅटरीच्या हालचालीने गव्यांना राखणीचा भास होतो.
- शेतात झाडावर टेपरेकॉर्ड बसवून गाण्यांचा आवाज परिसरात सुरू राहिल्याने गवे शेताकडे फिरकत नाहीत.
जुगाडासाठी खर्च
शेतात बसविलेल्या संचात विजेची तार, दोन बॅटऱ्या, दोन हॅलोजन, दोन मोठे बल्ब, टेपरेकॉर्ड यांचा समावेश असून, साधारणपणे ४,५०० रुपयांचे हे साहित्य आहे.
दिवसभर राबराब राबायचे आणि रात्री पीक राखणे त्रासदायक होते म्हणून गव्यापासून पिकाचे संरक्षण करण्याची युक्ती सुचली. गव्यापासून शाळू पिकाचे संरक्षण करण्यासाठी बनविलेल्या जुगाडाचा वापर गेली सात वर्षे करीत आहे. शिवारातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांचे गव्याने नुकसान केले आहे. आपल्या पिकाच्या देटालाही गव्यांनी धक्का लावलेला नाही. गव्यापासून पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी आशा जुगाडाचा वापर गरजेचे आहे. - गोरख निकम, निकमवाडी, ता. पन्हाळा
अधिक वाचा: खोडवा ऊस व्यवस्थापनातील चार कामे एकाच वेळी करणारे औजार; पाहूया सविस्तर