लक्ष्मण सरगर
आटपाडी: शेती म्हणजे फक्त कष्ट नव्हे, तर दूरदृष्टी, संशोधन आणि बदल स्वीकारण्याची तयारी हे समीकरण प्रत्यक्षात उतरवणाऱ्या जितेंद्र ऊर्फ दादासाहेब देशमुख यांची आटपाडीतील केळी थेट दुबईच्या बाजारपेठेत झळकत आहेत.
एका प्रयोगशील शेतकऱ्याच्या मेहनतीचे हे यश सर्वांसमोर आहे. देशमुख यांनी चार एकर बागेत विल्यम्स जातीच्या १२५० झाडांची लागवड केली असून, पहिल्याच तोड्यात १६ टन केळीचे उत्पादन घेतले.
ही केळी अजरबैजान, इराण, इराक, कतर, मस्कत आणि दुबई देशांत पोहोचली असून, प्रति किलो २१.७५ रुपये असा दर मिळाला. ही निर्यात श्रीपूर येथील आझाद कबीर शेख यांच्या माध्यमातून झाली आहे.
सेंद्रिय पद्धतींचा अवलंब फायदेशीर
◼️ जितेंद्र देशमुख केवळ उत्पादनावर लक्ष केंद्रित न करता सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या पद्धतींचा अवलंब करतात.
◼️ रासायनिक खतांचा वापर कमी ठेवून त्यांनी जीवामृत, सेंद्रिय खत, केळीचा पालापाचोळा यांचा वापर करून जमिनीचा पोत सुधारला.
◼️ यामुळे जमिनीत पांढऱ्या मुळ्यांची वाढ आणि सेंद्रिय घटकांची समृद्धी दिसून आली आहे.
'केळी' ठरतेय नवे 'डाळिंब'
◼️ डाळिंबाच्या पावलावर पाऊल ठेवत केळीही आता आटपाडीतील शेतकऱ्यांसाठी नवीन उत्पन्नाचा मोठा आधार ठरत आहे.
◼️ झपाट्याने वाढणारी मागणी, कमी कालावधीत परतावा आणि निर्यातक्षम गुणवत्तेमुळे केळी हे पीक लवकरच आटपाडी तालुक्याच्या शेती विकासाचा नवा चेहरा ठरणार आहे.
◼️ जितेंद्र देशमुख यांच्या या केळीच्या बागेतील नव्या प्रयोगाला अमरसिंह देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले आहे.
◼️ शेतीत नवीन पर्यायांची दारे खुली करणाऱ्या देशमुख यांच्या कार्याची तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून दखल घेतली जात आहे.
चांगली योजना, योग्य नियोजन आणि मेहनत यांची त्रिसूत्री शेतीला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकते. - जितेंद्र देशमुख, प्रगतीशील शेतकरी
अधिक वाचा: शेतकरी उत्पादक गट, कंपन्या व सहकारी संस्थासाठी ऊस विकास योजना; कसा घ्याल लाभ? वाचा सविस्तर