सेनापती कापशी : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाचे १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या पंधरवड्यातील प्रतिटनाला ३४०० रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा केले आहे.
तोडग्यानुसार प्रतिटनाला उर्वरित १०० रुपये गाळप हंगाम समाप्तीनंतर दिले जाणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तोडग्यानुसार ३४०० रुपये पहिला हप्ता आणि उर्वरित शंभर रुपये कारखान्याचा हंगाम संपल्यानंतर दिले जाणार आहेत, असे जाहीर केले होते.
त्यानुसार सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडे गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये एक नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरअखेर गाळपास आलेल्या उसाची बिले प्रति टन ३४०० रुपयांप्रमाणे अदा केली आहेत.
तसेच तोडग्यानुसार द्यावयाचे उर्वरित १०० रुपये गाळप हंगामानंतर अदा करणार आहे. सेनापती कारखान्याने चालू गाळप हंगामात आजअखेर १,५९,८२५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, सरासरी १०.५५ च्या उताऱ्याने १,२८,६५० साखर उत्पादित केली आहे.
१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत गाळप केलेल्या १,०८,२५५ मे. टनाची ३४०० रुपये प्रतिटनाप्रमाणे ऊस बिले बुधवार २६ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी केले आहे.
अधिक वाचा: सोमेश्वर कारखान्याकडून चालू गळीत हंगामासाठी पहिला हप्ता जाहीर; कसा दिला दर?
