सरवडे : बिद्री (ता. कागल) दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत हंगामात येणाऱ्या उसाला प्रतिटन ३६१४ रुपये ऊस दर देणार असल्याची सुधारित घोषणा अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केली.
bidri sugar factory कारखाना प्रधान कार्यलयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील हे थेट मुंबईतून सहभागी झाले होते.
के.पी. पाटील म्हणाले, मागील हंगामाची रिकव्हरी धरून एफआरपीप्रमाणे ऊस दर द्यावयाचा की ज्या-त्या हंगामाची रिकव्हरी धरून एफआरपी द्यावयाची, याबाबत सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असलेने 'बिद्री'ने २०२५-२६ साठी पहिली उचल ३४५२ रुपये जाहीर केली होती.
मात्र, 'बिद्री'ने शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची परंपरा कायम ठेवत येत्या हंगामात येणाऱ्या उसास प्रतिटन ३,६१४ रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले, रंगराजन समितीच्या उत्पन्न विभागणी सूत्रांनुसार एकूण उत्पन्नाच्या ७० टक्के ऊस दरासाठी, तर ३० टक्के रक्कम साखर उत्पादन प्रक्रिया खर्चासाठी वापरण्याचा कायदा आहे.
या सूत्रानुसार २०२३-२४ मध्ये बिद्रीचा ऊस दर २६३९ रुपये इतका बसतो. मात्र, या हंगामात 'बिद्री'कडून ३४०७ रुपये ऊस दर देण्यात आला आहे. रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार ७६७ रुपये जादा आहेत.
२०२४-२५ मध्ये उत्पन्न विभागणी सूत्रानुसार २४७५ रुपये ऊस दर बसतो. मात्र, या हंगामात ३३७० रुपये ऊस दर देण्यात आला असून, तो उत्पन्न विभागणी सूत्रानुसार ८९४ रुपये जादा आहे.
यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.
अधिक वाचा: कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' १२ साखर कारखान्यांनी जाहीर केली पहिली उचल; जाणून घ्या सविस्तर
