सोलापूर : जिल्ह्यात ३४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडे नोंद असले तरी पहिल्या १० दिवसांची संपूर्ण एफआरपी सात कारखान्यांनी दिली आहे.
याशिवाय ९ साखर कारखान्यांनी काही रक्कम दिली आहे. अठरा साखर कारखान्यांनी चाळीस दिवसांत फक्त ऊस गाळप केले. मात्र, शेतकऱ्यांना दमडीही दिली नसल्याचे दिसत आहे.
१ नोव्हेंबर रोजी किंवा एक-दोन दिवस पुढे-मागे सुरू झालेल्या साखर कारखान्यांनी पहिल्या दहा दिवसांचे (एक ते दहा नोव्हेंबर) उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्यात जमा करणे एफआरपी कायद्यानुसार बंधनकारक आहे.
ऊस गाळपाला आणल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या नियमाप्रमाणे सहा कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत.
तर १० साखर कारखान्यांनी काही रक्कम मागे ठेवत काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडील माहितीवरून दिसत आहे
नऊ दिवसांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर
विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर, श्री. पांडुरंग श्रीपूर, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील अकलूज, दि. सासवड माळीनगर, आष्टी शुगर, विठ्ठलराव शिंदे करकंब व शंकर सहकारी या सात साखर कारखान्यांनी पहिल्या ९ दिवसांचे उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.
काही प्रमाणात रक्कम दिलेले कारखाने
धाराशिव साखर कारखाना (सांगोला सहकारी), बबनराव शिंदे तुर्कपिंपरी, राजवीर अॅग्रो आलेगाव, सीताराम महाराज शुगर, युटोपियन शुगर, विठ्ठल रिफायनरी करमाळा, येडेश्वरी खामगाव, सिद्धनाथ शुगर तिर्हे, श्री. विठ्ठल गुरसाळे या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे काही पैसे दिले तर काही रक्कम दिलेली नाही.
अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याने मागील तीन वर्षांपूर्वीचे ऊस बिल केले जमा; कसा दिला दर?
