विदर्भाच्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात सातपुड्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात सध्या शेतीकामांना गती आली आहे. पेरण्या करण्याच्या कामांवर अधिक भर दिला जात आहे.
या कामांसाठी आदिवासी बांधव एकमेकांच्या साहाय्याला येत पेरण्या पूर्ण करीत आहेत. पारंपरिक अशा या पद्धतीला 'लाह' असे म्हटले जाते. शेकडो वर्षांपासून सातपुड्यात ही परंपरा जपली जात असून, अद्यापही अबाधित आहे.
आदिवासी बांधवांचे जीवनमान हे जल, जंगल आणि जमिनीशी निगडित आहे. त्यांच्या प्रथा, परंपरा, चालीरीती आजही जगाला मार्गदर्शक ठरतात, त्यातीलच 'लाह' ही एक परंपरागत श्रमदानाची पद्धत आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त व जगाला मार्गदर्शक ठरत आहे.
सातपुड्यातील अनेक आदिवासी बांधवांकडे शेतजमीन असल्याने शेतीतील कामे केवळ एक कुटुंब मिळून वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे 'लाह' पद्धतीने मोठ्चा शेतावरील कामे ही गावातील शेतकरी कुटुंबे एकमेकांच्या मदतीने पूर्ण करतात. या श्रमदानालाच आदिवासी बांधव 'लाह' म्हणून संबोधतात.
आदिवासी बांधवांची अनेक कामे लाह पद्धतीने केली जातात. घरबांधणीची कामे, शेतातील पेरणी, निंदणी, कापणी ही कामे करण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबातील एक स्त्री-पुरुष व्यक्ती लाहसाठी येते व ज्या कुटुंबाने लाह बोलावली, त्या कुटुंबाचे काम लोक लाह पद्धतीने करून देतात. हे काम करत असताना महिला बोलीभाषेत विविध गाणी म्हणतात.
त्यामुळे हे काम आनंद आणि उत्साहात सामूहिकरीत्या पूर्ण केले जाते. लाह पद्धतीने काम केल्याची कोणतीही मजुरी दिली जात नाही. सध्या सातपुड्यात (मोर) भगर पेरणीचा काळ असल्याने लोक मोठ्या शेतातील भगर पेरणीसाठी लाह पद्धतीने आपल्या शेतातील काम करताना दिसत आहेत.