सोलापूर : तीन हजार व त्यापेक्षा अधिक रक्कमेची पहिली उचल किंवा एकरकमी दर जाहीर करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या तब्बल २३ वर पोहोचली आहे.
२८०० व त्यापेक्षा अधिक पहिली उचल किंवा एकरकमी रक्कम ९ कारखान्यांनी जाहीर केली आहे. जिल्हात ४० पैकी ३६ कारखाने प्रथमच हंगाम घेत आहेत.
सोलापूर जिल्हात यंदा सर्वाधिक ३६ साखर कारखाने ऊस गाळप घेत आहेत. विठ्ठलराव शिंदे, श्री. पांडुरंग श्रीपूर या साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करण्यात आघाडी घेतली.
त्यानंतर सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, शंकर सहकारी, सासवड माळीनगर या साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला. जिल्ह्यातील ओंकार शुगरच्या पाच कारखान्यांचे ऊस दर एका पाठोपाठ एक जाहीर झाले.
एकीकडे शेतकरी संघटनांचा दरासाठी रेटा तर काहींनी स्वतःहून तीन हजारावर दर दिल्याने एका पाठोपाठ एक अशा २३ साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार व त्यापेक्षा जाहीर केली आहे.
९ कारखान्यांनी २८०० रुपयांपेक्षा अधिक पहिली उचल जाहीर केली आहे. तीन साखर कारखान्यांनी गाळप हंगामाला दोन महिने झाले तरी दर जाहीर केला नाही व ऊस उत्पादकांचे पैसेही दिले नाहीत.
कोणी किती दिला दर?
३००० रु व त्यापेक्षा अधिक दर देणारे कारखाने
ओंकार चांदापुरी, ओंकार म्हैसगाव, ओंकार (व्ही.पी.), ओंकार रुद्देवाडी, ओंकार (सहकार शिरोमणी), श्री. पांडुरंग श्रीपूर, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब, श्री. विठ्ठल गुरसाळे, श्री. शंकर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, सीताराम महाराज खर्डी, सासवड माळीनगर, वृंदावन (जुना इंद्रेश्वर), राजवी आलेगाव, शिवगिरी, भैरवनाथ लवंगी, जकराया वटवटे, युटोपियन, अवताडे शुगर, आष्टी शुगर, श्री. संत दामाजी व सिद्धेश्वर सोलापूर.
२८०० व २८५० रु दर देणारे कारखाने
बबनराव शिंदे तुर्कपिंपरी, संत कुर्मदास, येडेश्वरी शुगर, विठ्ठल रिफायनरी, लोकनेते बाबुराव पाटील अनगर, लोकमंगल बीबीदारफळ, सिद्धनाथ तिर्हे, धाराशिव (सांगोला सहकारी), भीमा टाकळी सिकंदर.
२७०० रु दर देणारे कारखाने
लोकमंगल भंडारकवठे या साखर कारखान्याने प्रतिटन २७०० रुपयाने ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. जय हिंद आचेगाव, गोकुळ धोत्री, लोकशक्ती तेरामैल या साखर कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर केला नाही.
दरवाढ शक्यता?
◼️ जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांनी २८०० ते २९०० रुपये दरम्यान ऊस दर जाहीर केला आहे.
◼️ मात्र, यातील बऱ्याच कारखान्यांना उसाची कमतरता भासू लागली आहे.
◼️ प्राधान्याने अधिक दर देणाऱ्या कारखान्यांवर शेतकरी ऊस देत आहेत.
◼️ त्यामुळे काही साखर कारखान्याचा ऊस दर जानेवारीपासून वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
◼️ जय हिंद आचेगाव, गोकुळ, सिद्धनाथ व लोकमंगलचा ऊस दर सर्वात कमी राहण्याची शक्यता आहे.
◼️ मात्र, यंदा कमी दर देणारे साखर कारखानदार पुढील हंगामात उसाअभावी अडचणीत येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
अधिक वाचा: फक्त २० हजार रुपयांच्या खर्चात घेतले १२० टन उसाचे विक्रमी उत्पादन; कशी केली किमया? वाचा सविस्तर
