सोलापूर : तीन हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची पहिली उचल जाहीर करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या तब्बल १७ वर पोहोचली असून अठ्ठावीसशे व त्यापेक्षा अधिक पहिली उचल सहा कारखान्यांनी जाहीर केली आहे.
ऊस दराच्या प्रश्नांवर जिल्ह्यात सर्वच शेतकरी संघटना एकत्र आल्या असून लोकमंगल साखर कारखान्यांवर दोन दिवसांपासून प्रमुख नेते ठाण मांडून बसले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात यंदा सर्वाधिक ३६ साखर कारखाने ऊस गाळप घेत आहेत. जवळपास ३५ साखर कारखाने सुरू झाले आहेत.
विठ्ठलराव शिंदे, श्री. पांडुरंग श्रीपूर या साखर कारखान्यांनी सुरुवातीला ऊस दर जाहीर केला. मात्र, शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला.
जिल्ह्यात पाच साखर कारखान्यांचे गाळप घेणाऱ्या ओंकार ग्रुपने जिल्ह्याच्या पूर्वभागातील कारखान्यांची पहिली उचल २९०० रु. व नंतर १०० रु., तर पश्चिम भागातील कारखान्यांची पहिली उचल ३०५० रु. व नंतर १०० रु. दर जाहीर केला.
एकीकडे शेतकरी संघटनांचा दरासाठी रेटा, तर काहींनी तीन हजारांवर दर दिल्याने एकापाठोपाठ एक अशा १७ साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार व त्यापेक्षा जाहीर केली आहे.
सहा कारखान्यांनी २८०० रुपयांपेक्षा अधिक पहिली उचल जाहीर केली आहे. १२ साखर कारखान्यांनी गाळप हंगामाला दीड महिना झाला तरी दर जाहीर केला नाही व ऊस उत्पादकांचे पैसेही दिले नाहीत.
तीन हजारांपेक्षा अधिक दर देणारे कारखाने
ओंकार चांदापुरी, ओंकार म्हैसगाव, ओंकार (व्ही. पी.), ओंकार रुद्देवाडी, ऑकार (सहकार शिरोमणी), श्री. पांडुरंग श्रीपूर, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब, श्री. शंकर, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील, सीताराम महाराज खर्डी, सासवड माळीनगर, वृंदावन (जुना इंद्रेश्वर), राजवी आलेगाव, शिवगिरी व जकराया यांनी तीन हजार व त्यापेक्षा अधिक ऊस दर जाहीर केला.
२८०० ते अधिक दर देणारे कारखाने
बबनराव शिंदे तुर्कपिंपरी, संत कुर्मदास, आष्टी शुगर, येडेश्वरी शुगर, भैरवनाथ लवंगी व विठ्ठल रिफायनरी या साखर कारखान्यांनी २८०० रु. व २८५० रु. दर जाहीर केला आहे.
अद्याप दर न जाहीर न करणारे कारखाने
लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, युरोपियन, अवताडे शुगर, सिद्धनाथ शुगर, संत दामाजी, लोकनेते बाबुराव पाटील, धाराशिव सांगोला, भीमा टाकळी सिकंदर, सिद्धेश्वर सोलापूर, जय हिंद, गोकुळ या १२ साखर कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर केला नाही.
अधिक वाचा: 7/12 Download: सातबारा काढण्यासाठी आता तलाठ्याकडे जायची गरज नाही; डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर
