Join us

राज्यात पुढील हंगामात ऊस लागवड क्षेत्रात मोठी वाढ होणार; कोणत्या जिल्ह्यात किती लागवड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:07 IST

Sugarcane Cultivation राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक ऊस क्षेत्र असून पुढील साखर हंगाम फुलफिल राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अरुण बारसकरसोलापूरः राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक ऊस क्षेत्र असून पुढील साखर हंगाम फुलफिल राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

साखर पट्टयातील पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील जिल्ह्यात कृषी खात्याकडे ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर नोंदले असल्याचे दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात सुमारे १ लाख ५६ हजार हेक्टरवर ऊस लागवड होण्याची शक्यता आहे.

राज्यात मागील (२०२३) वर्षी पाऊस कमी पडल्याने २०२४-२५ च्या ऊस गाळपावर कमालीचा परिणाम दिसून आला. राज्यातील काही जिल्ह्यातील साखर कारखाने सोडले तर बहुतांशी कारखाने सरत्या हंगामात पूर्ण क्षमतेने चालले नाहीत.

त्याचा परिणाम ऊस तोडणी यंत्रणेला काम मिळाले नाही पर्यायाने घेतलेली उचल पूर्ण देता आली नाही, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना फारच कमी कालावधीत ऊस वाहतूक करता आल्याने बँकांचे कर्ज व्याज हप्ते भरता आले नाहीत.

साखर कारखाने उसाअभावी कमी क्षमतेने चालल्याने खर्च तर पूर्ण करूनही उत्पादन कमी आले, पर्यायाने नुकसान झाले.

ऊस तोडणी यंत्रणा उसाअभावी या कारखान्यांकडून दुसऱ्या ठिकाणी (ऊस असेल तेथे) हलवावी लागली. कसा बसा दोन महिने कारखाने चालवून १२ महिन्यांचा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भार साखर कारखान्यांना सोसावा लागतोयं.

एकंदरीत साखर कारखानदारी अडचणीत आहेच त्यापेक्षा पदरमोड करून ऊस पीक घेणारा शेतकरी अधिक अडचणीला तोंड देत आहेत. मागील चार वर्षांच्या ऊस गाळपावर नजर टाकली असता सरलेला हंगाम फारच कठीण ठरल्याचे दिसत आहे.

मात्र, २०२४ च्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने राज्यातच पाण्याची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे जुलै-ऑगस्ट महिन्यापासूनच राज्यात व जिल्ह्यात ऊस लागवड सुरू झाली आहे.

जवळपास आठ महिने उसाची लागवड सुरू राहिली. राज्यात उसाचे सरासरी (जवळपास) क्षेत्र किती असावे?, हे कृषी विभाग व साखर विभागाने निश्चित केले आहे. त्यापेक्षाही यंदा ऊस क्षेत्र अधिक आहे.

राज्याचे कृषी खात्याकडील ऊस लागवड क्षेत्र सर्वसाधारण (२०१६-१७ ते २०-२१) नुसार १० लाख ९५ हजार ७५ हेक्टर असून सध्याची ऊस लागवड ११ लाख २३ हजार हेक्टर १०२ टक्के इतके नोंदले आहे.

जिल्हासरासरी क्षेत्रप्रत्यक्षात क्षेत्र
कोल्हापूर१,८६,२१५१,८२,४५१
सोलापूर१,३१,६२८१,५६,५६०
पुणे१,१७,०७११,३०,२१५
अहिल्यानगर९४,६९३१,०१,७९१
सातारा९८,४७८१,०७,८२५
सांगली१,३५,८९६१,०८,२८४
धाराशिव७४,२७५५३,४००
लातूर३६,५८४५४,५९३
बीड४८,२६५६१,५३७
छ. संभाजीनगर१९,६५६२५,७३९
जालना२८,९९८३६,७९६
परभणी५,०९२२७,१६५
नांदेड२२,३०३२८,२५३

(सर्व आकडेवारी हेक्टरमध्ये)

अधिक वाचा: गुळ व आधारित उत्पादनातून वाढविला शेतीचा गोडवा; खर्च वजा जाता पावणेतीन लाख रुपयांचा फायदा

टॅग्स :ऊससाखर कारखानेपीकलागवड, मशागतमहाराष्ट्रमराठवाडाशेतकरीशेती