शरद झावरे
पारनेर : पारनेर तालुक्यातील तिखोल, वनकुटे या परिसरात सोमवारी दुपारी ३.३० ते ४ दरम्यान वादळी वाऱ्यासह अर्धा तास गारपीट झाली. यामुळे टोमॅटो, वाटाणा, कोबी, कलिंगड पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतामध्ये काढून ठेवलेला अथवा चाळीमधील कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली.
टाकळी ढोकेश्वर, सुपा परिसरातही विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने १५ ते २० मिनिटे हजेरी लावली, पावसामुळे मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये थोड्या कालावधीसाठी गारवा निर्माण झाला.
गारपिटीसह अवकाळीने शेतात सखल भागात, बांधांमध्ये पाणी साचले होते. एकीकडे दुष्काळी परिस्थितीशी सामना करत पिकविलेला टोमॅटो, वाटाणा, कोबीसह चारा पिकांचे नुकसान झाले.
हवामान विभागाने जिल्ह्याच्या काही भागात ३ ते ६ मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारा, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट जारी केला होता.
दरम्यान, सोमवारी (दि.५) दिवसभर तालुक्यात ढगाळ वातावरण होते. ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याप्रमाणे वातावरण तयार होऊन दुपारी ३ ते ४.३० च्या सुमारास अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.
यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धांदल उडाली. हवामान विभागाच्या सुचनेमुळे काही शेतकरी सावध होते.
पिके पाण्याखाली, लाखोंचे नुकसान
- गारपिटीमुळे जवळपास १ हेक्टरमध्ये लागवड केलेल्या टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
- लागवड केलेला कोबी पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
- पिकात पाणी साचले, तसेच गारांचा तडाखाही बसला. पिकाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने याचे पंचनामे करावेत, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी तिखोलचे सुभाष ठाणगे, वनकुटेचे बबनराव काळे यांनी केली आहे.
अधिक वाचा: हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही बदल; आता या शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसानभरपाई