चंद्रकांत गायकवाड
गेल्या आठ दिवसांपासून रोजच ढगफुटीसदृश होणाऱ्या अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, नलवडे खुर्द आणि नलवडे बुद्रुक ही गावे पूर्णतः जलमय झाली आहेत. सुकीनाणी नदीकाठच्या या गावांची काळीभोर, सुपीक जमीन, कपाशी आणि तुरीची पारंपरिक खरीप पिके ही येथील ओळख आहे. त्यामुळेच ही गावे पांढऱ्या सोन्याचे आगर म्हणून ओळखली जात.
मात्र गेल्या आठ दिवसांपासून दहा पिढ्यांमध्ये कधी न पडलेला मुसळधार पाऊस सातत्याने कोसळत आहे. परिसरातील शेतांमध्ये नेहमीप्रमाणे कपाशी आणि तुरीची लागवड आहे. नलवडे खुर्द व बुद्रुक मिळून सुमारे २२०० हेक्टर क्षेत्र जलमय होऊन पाण्याखाली गेल्याचे 'लोकमत'च्या २४ सप्टेंबर रोजीच्या पाहणीत स्पष्ट झाले.
पाथर्डी तालुक्यातील सुसरे, पागोरी पिंपळगाव आणि शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथून सोमठाणेकडे जाणारे तीन्ही जोडरस्ते बंद झाले असून गावाने अक्षरशः बेटाचे स्वरूप घेतले आहे. दरम्यान रामदास काकडे सांगतात “साडेतीन एकरवरील तीस ते चाळीस बोंडे आलेले कपाशी पीक पाण्यामुळे वाहून गेले आणि जमीनही खचली. सर्वस्व उध्वस्त झालंय.”
दुसरीकडे दुर्योधन नलवडे म्हणाले “नद्यांच्या संगमावर पुराचे पाणी इतके वाढले की, लोकवस्तीत शिरलं. मुख्य वीजवाहिनीचे १३ खांब वाहून गेले, परिणामी संपूर्ण गाव अंधारात आहे. गिरण्या बंद असून मोबाईल चार्जिंगसाठी शेजारच्या गावांवर अवलंबून राहावं लागतं.” सर्जेराव वाघमोडे यांची सात एकर कपाशी पूर्णतः पाण्याखाली आहे. “ऊसामध्ये दोन फूट पाणी साचले आहे” अशी माहिती त्यांनी दिली.
यासह ज्ञानेश्वर घाडगे, देविदास कवडे यांचाही हाच स्वर आहे. राजेंद्र आवारे व त्यांच्या भावांनी मिळून वीस एकरवरील कपाशी व तुरीचं पीक गमावलं आहे. भाऊसाहेब दौडे व त्यांचं कुटुंब घरात पाणी शिरल्याने शेळ्यांसह करडे घेऊन रात्रभर घराच्या छतावर थांबावं लागलं. अमोल नलवडे म्हणतात “या पुरात केवळ वैयक्तिक नाही तर सार्वजनिक हानीही मोठी आहे. नदीवरील चार बंधारे वाहून गेले तर मोबाईल टॉवरवर तीन वेळा वीज पडली.”
सुदैवाने परिसर निर्मनुष्य असल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र आता दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करताना पुररेषेचे वास्तव लक्षात घेऊन नदीतील अतिक्रमण हटवावे पुलांची उंची वाढवावी आणि काळीभोर मातीमुळे रस्ते खराब होतात हे लक्षात घेता सिमेंट काँक्रीटचे रस्ते करावेत, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. त्यामुळेच अशा दुःखद घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल.