हापूस (अल्फान्सो) शब्द हा कोकणचा, महाराष्ट्राचा व देशाचा अमूल्य ठेवा आहे. भारतीय आंब्याच्या व्यापारामध्ये व्यापारीदृष्ट्वा 'हापूस' हा शब्द परवलीचा व आर्थिक (शेकडो कोटी रुपये) मूल्याचा आहे. जेव्हापासून कोकणातील हापूस पाच जिल्ह्यांसाठी 'जीआय' नोंदणीकृत झाला आहे आणि बाजारात 'जीआय'चा प्रसार होतो आहे, तेव्हापासून हापूस या नावाने भेसळ करून व्यवसाय करणाऱ्या अनेकांच्या हितसंबंधांना बाधा आली आहे.
वलसाड, गुजरात येथील आंबा उत्पादक व संबंधित संस्थांनी वलसाड आंब्यासाठी 'हापूस' या विशेषणाची मागणी सरकारदरबारी नोंदविली आहे. जुन्नर भागातील शेतकरी व निमसरकारी संघटनांनी तेथील आंब्यालाही 'शिवनेरी हापूस' या नावाची मागणी केली आहे. याबाबतची न्यायिक प्रक्रिया सुरू आहे.
फक्त कोकणातील आंब्यालाच 'हापूस' (अल्फान्सो) हे नाव अबाधित राहावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोकणातील पाचही जिल्ह्यांतून आतापर्यंत २,०३५ शेतकऱ्यांनी भौगोलिक मानांकन रजिस्ट्रेशन केले आहे. कोकणातील हापूस आंबा, घोलवड चिकू, वेंगुर्ला काजू, कोकम, अलिबाग पांढरा कांदा या पाच कृषी उत्पादनांना 'जीआय' मानांकन आहे.
जीआय मानांकनप्राप्त संस्थांनी वापरकर्ते सभासद (ॲथॉटिक युजर्स) जास्तीत जास्त करणे आवश्यक असते. हापूस २०३५, सोलापूर डाळिंब १७६७, जळगाव केळी १४३६ या 'जीआय'मध्ये सभासद संख्या तरी दिसते. इतर जीआय मानांकन वापरकर्त्या सभासदांची संख्या एकतर अत्यल्प आहे किंवा एकही अधिकृत वापरकर्ता सभासद नाही.
जीआय मानांकन म्हणजे?
• भौगोलिक निर्देशन (जीआय) हा पेटंट, ट्रेडमार्क, इंडस्ट्रियल डिझाइन व कॉपीराइटसारखा बौद्धिक संपदेचा हक्क आहे.
• एखाद्या भौगोलिक प्रदेशातील वैशिष्ट्यांमुळे, हवामान, संस्कृतीमुळे एखाद्या उत्पादनात, उत्पादन प्रक्रियेत विशेष दर्जा, चब, रंग, बास उतरत असतील, ते वर्षानुवर्षे कायम राहत असतील तर, अशा उत्पादनाची नोंदणी भौगोलिक निर्देशन नोंदणी कार्यालय, चेन्नई येथे करता येते.
• अशा उत्पादनांना भेसळ होणे, कमी किंमत मिळणे यांसारख्या गोष्टींपासून संरक्षण मिळते. १० वर्षांकरिता जीआय प्रमाणपत्र मिळते. दर १० वर्षांनी नूतनीकरण करावे लागते.
प्रश्न 'हापूस'च्या हक्काचा आहे...
• भौगोलिक मानांकन हे उत्पादनातील प्राचीन परंपरागत तंत्र, भौगोलिक स्थिती, हवा, पाणी इतर साहित्यांचा उत्तम पद्धतीने कसा वापर केला गेला आहे आणि त्याला स्थानिक परंपरांची कशी जोड दिली गेली आहे, यावर अवलंबून असते.
• जीआयमुळे मिळालेल्या ज्ञानावर, जीआय नोंदणी प्रमाणपत्र मिळविलेल्या संस्थेची व अधिकृत वापरकर्त्यांची मालकी सामूहिक असते.
• या उत्पादकांच्या समूहाला पर्यायाने समाजाला, शेतकरी, कलाकार यांना आर्थिक लाभ होतो. जीआय मिळाले म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी हाती आली, असा सार्वत्रिक गैरसमज आहे. पण ते तसे नाही...
भारतातील पहिले जीआय मानांकन
टी-बोर्ड, इंडिया यांना. २९ ऑक्टोबर २००४ रोजी दार्जिलिंग चहासाठी मिळाले.
महाराष्ट्रातील पहिले जीआय मानांकन
टेक्स्टाइल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांना. १९ सप्टेंबर २००५ रोजी सोलापूर चादरीसाठी मिळाले.
किती आहेत एकूण जीआय मानांकनप्राप्त उत्पादने?
• ७१९ - देशात.
• ५३ - महाराष्ट्रात.
कोणत्या उत्पादनांना मिळालेय मानांकन ?
सोलापूरी चादर, नाशिक व्हॅली वाईन, नागपुरी संत्री, सोलापुरी डाळिंब, कोल्हापुरी चप्पल इ.
दहा वर्षांनी मिळाले यश
हापूस (अल्फान्सो) या जगप्रसिद्ध आंब्याला २०१८ ऑक्टोबरमध्ये जीआय मानांकन मिळाले. यासाठी २००८ पासून प्रयत्न सुरू होते.
या चार संस्थांना एकत्रित मानांकन
• डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.
• कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्था मर्यादित, रत्नागिरी.
• देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जामसंडे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग).
• केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संघ मर्यादित केळशी, ता. दापोली.
'हापूस' या पाच जिल्ह्यांकरिता नोंदणीकृत
ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
डॉ. विवेक यशवंत भिडे
अध्यक्ष, कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्या., रत्नागिरी.
