बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात गावरान बोरांची चव दुर्मीळ होत चालली आहे. पूर्वी जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर बोराची झाडे आढळत असत. परंतु, आता ती नामशेष होऊ लागली असून, बाजारात केवळ संक्रांतीच्या सणालाच या गावरान बोरांची आवक होताना दिसते.
ग्रामीण भागात शेताच्या बांधावर, विहिरीच्या कडेला सर्रास गावरान बोरांची झाडे असायची. या झाडांवरील गोड - आंबट - तुरट बोरं लहान - मोठ्यांसाठी रानमेवा ठरत असत. मामाच्या गावाकडे गेल्यावर कोणत्या झाडाची बोरे चांगली लागतात, यावर बच्चे कंपनीमध्ये चर्चा रंगायची.
त्यानंतर ठरवून एखाद्या झाडावर धाड टाकून मुलं मनसोक्त बोरं खात. मात्र, आता वाढती बागायती शेती, जमीन सपाटीकरण आणि रासायनिक शेतीच्या प्रसारामुळे या बांधावरील झाडांचा अस्तच होत चालला आहे. त्यामुळे गावरान बोरांची चव आणि गंधही आता आठवणींतच राहिला आहे.
बोरांमध्ये व्हिटॅमिनसह अनेक औषधी गुणधर्माचा असतो समावेश
• बाजारपेठेत आता संकरित व मोठ्या आकाराच्या बोरांचे वर्चस्व दिसते. नवीन पिढीतील मुलांना या गावरान बोरांची खरी चव कधी अनुभवायलाच मिळत नाही. संक्रांतीच्या सणात वाण म्हणून या गावठी बोरांना विशेष महत्त्व असते.
• या बोरांमध्ये व्हिटॅमिन सी आणि एसह अनेक औषधी गुणधर्म आहेत. बोरे खाल्ल्याने पचन सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते, असे जाणकार सांगतात.
• त्यामुळे गावरान बोरांचा हंगाम केवळ चवदारच नाही, तर आरोग्यदायीही ठरतो, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगत आहे.
