महेश जगताप
सोमेश्वरनगर : बीड जिल्ह्यातील गांधनवाडी येथील एका ऊसतोड मजुराच्या मुलाने आपल्या कुटुंबाची गरिबी आणि हलाखीची परिस्थिती दूर सारून भारतीय सैन्यामध्ये निवड मिळवली आहे.
वयाच्या अवघ्या साडेसतरा वर्षी भारतीय सैन्यात दाखल झालेला शंकर सोमीनाथ इथापे याचा हा प्रवास अनेक गरीब आणि होतकरू तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
आई-वडिलांना भेटण्यासाठी कारखान्यावर आल्यानंतर 'कोपीवरची शाळा' या उपक्रमाने त्याचा सत्कार केला. शंकरचे वडील, सोमीनाथ खंडू इथापे, गेली १५ ते २० वर्षे ऊसतोडीसाठी सहा महिने सोमेश्वर कारखान्याच्या परिसरात स्थलांतरित होतात.
कधी शेतात वडिलांना मदत करत, तर कधी रात्री दिव्याखाली अभ्यास करत शंकरने आपले शिक्षण पूर्ण केले. सैन्यात भरती होण्याचे स्वप्न त्याने लहानपणापासूनच पाहिले होते.
१० वी नंतर त्याने बारामतीमध्ये गुरुकुल अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले आणि त्याच्या या जिद्दीला अखेर यश आले. लहानपणापासूनच पाहिले अन् दिव्याखाली अभ्यास करत शंकरने आपले शिक्षण पूर्ण केले.
या निवडीबद्दल आमदार सुरेश धस व जि. प. सदस्य माउली जरांगे आणि गावकऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. शंकर सोमीनाथ इथापे म्हणाला, सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची माझी इच्छा होती.
माझ्या यशाचे श्रेय माझ्या आई-वडिलांच्या कष्टाला आणि मार्गदर्शकांना जाते. सोमेश्वर कारखान्यावरील कोपीवरची शाळा येथे शंकर याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समन्वयक संतोष शेंडकर, नौशाद भगवान, संभाजी खोमणे, संतोष होनमाने, आरती गवळी, अनिता ओव्हाळ, अश्विनी लोखंडे, नितीन मोरे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा: आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले व नोंदी आता रद्द होणार; काय आहे निर्णय?
