दत्ता पाटील
तासगाव : विदेशातील निकृष्ट, कवडीमोल दराने मिळणारा बेदाणा आयात करायचा, त्याला घातक रसायनांचा वापर करून वॉशिंग सेंटरमधून चकाकी आणायची.
हाच बेदाणा भारतीय बॉक्समध्ये रिपॅकिंग करून सांगली-तासगावच्या नावावर खपवायचा, हा कारनामा बेदाणा इंडस्ट्रीला काळिमा फासणारा ठरला आहे.
एकीकडे ग्राहकांच्या माथी निकृष्ट, बनावट माल मारला जात असताना दुसरीकडे या सगळ्या यंत्रणेकडे प्रशासन मात्र गांधारीची भूमिका घेऊन डोळेझाक करत आहे.
परदेशी बनावटीचा बेदाणा भारतात आयात झाल्यानंतर परदेशी पॅकिंगमध्ये विकणे अपेक्षित होते. मात्र व्यापाऱ्यांनी अडते, खरेदीदार यांना हाताशी धरून बोगस शेतकरी तयार केले जातात आणि बेदाण्याची विक्री केली जाते.
आयात होणारा बेदाणा हा निकृष्ट दर्जाचा असतो. यावर केमिकलचा वापर करून वॉशिंग सेंटरच्या माध्यमातून कलर मिश्रण करून चकाकी आणली जाते आणि तो विक्रीस येतो.
बेदाण्याची चकाकी धोक्यामध्ये
◼️ निकृष्ट बेदाणा सांगली-तासगावच्या नावावर खपविण्याचा उद्योग राजरोस सुरू आहे.
◼️ याचा फटका भविष्यात सांगली जिल्ह्याच्या बेदाणा पंढरीला बसणार आहे.
◼️ वेळीच या अंदाधुंद कारभाराला लगाम बसला नाही तर सांगली-तासगावच्या बेदाण्याची चकाकी काळवंडण्याचा धोका आहे.
जो बेदाणा डुकरे खाणार नाहीत असा परकीय, निकृष्ट दर्जाचा बेदाणा आयात होत आहे. त्याच्यावर रसायनांचा वापर करून, विषारी रंग देऊन, इथल्या बाजारपेठेत भारतीय पॅकिंगमध्ये रिपॅकिंग करून राजरोस विकला जात आहे. या कारभाराविरोधात राज्यातील द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांना एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयावर लवकरच मोर्चा काढला जाईल. - मारुती चव्हाण, राज्य उपाध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ
बेदाणा व्यवसायात सांगली जिल्ह्याचे जगभर नाव आहे. या बँडला रिपॅकिंगच्या माध्यमातून धक्का पोहोचवला जात आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणून स्वतःचे खिसे भरण्याचा हा बेदाणा व्यापाऱ्यांचा उद्योग निषेधार्ह आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागामार्फत कस्टम व अन्य प्रकारची करचोरी या प्रकरणात झालेली असू शकते. अन्न व भेसळ विभाग हाही यामध्ये दोषी दिसतो आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून या अनागोंदी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. - संदीप (आबा) गिड्डे-पाटील प्रदेश सरचिटणीस, भाजप किसान मोर्चा
अधिक वाचा: तस्करी करण्याचा पायंडा शेतकऱ्यांच्या मुळावर; बेलगाम कारभाराने ५ हजार टन बेदाण्याची आयात
