संजय खासबागे
विदर्भाचा कॅलिफोर्निया असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादकांची दैनावस्था झाली. त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. संत्रा प्रक्रिया उद्योग तर निर्माण झालेच नाही, उलट जे उभारले तेही भंगारात गेले. देशातला एकमेव संत्रा बेल्ट म्हणून तालुक्याची ख्याती असून, संत्रा प्रक्रिया केंद्राचे भिजत घोंगडे कायम आहे. प्रक्रिया केंद्राची आजन्म प्रतीक्षाच करावी काय, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
वरूड तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी आहे. तब्बल २५ हजार ५०० हेक्टरमध्ये संत्र्याची लागवड आहे. यामध्ये २२ ते २३ हजार हेक्टरवर फळे देणारी संत्रा झाडे आहेत. सन १९८२ मध्ये कोळशी रोगाचा प्रादुर्भाव आणि नंतर पाणीटंचाई उद्भवल्याने लाखो संत्रा झाडांवर कुन्हाडी चालल्या. यादरम्यान प्रकल्प बंद पडला. येथे केवळ संत्र्याला व्हॅक्सिनेशनच केले गेले.
शीतगृहासह ग्रेडिंग
संत्र्याला योग्य दर मिळावा म्हणून साठवणूक, ग्रेडिंग आणि व्हॅक्सिनेशन करण्याच्या उद्देशाने दिवंगत वासुदेव देशपांडे यांच्या पुढाकाराने "ऑरेंज मँड्रेटस सिट्स किंग" या नावाने शीतगृह आणि व्हॅक्सिनेशन प्रकल्प एमआयडीसीमध्ये सुरू करून तालुक्यातून संत्रा उत्पादकांनी दुबई, हॉलंड, आदी राष्ट्रांत कंटेनर पाठविले. ही संस्थासुद्धा डबघाईस आल्यानंतर बाजार समितीने ही यंत्रणा खरेदी करून संत्र्याला योग्य भाव आणि साठवणूक करण्याकरिता प्रयत्न केले, मात्र यश आले नाही.
कधी निसर्ग, तर कधी बाजारपेठेला पडावे लागते बळी
• १९५७ मध्ये सहकारी तत्त्वावरील पहिली ज्यूस फॅक्टरी शेंदूरजनाघाटमध्ये जिल्हा फळ बागाईतदार रस उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नावाने उभी राहिली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते २७ नोव्हेंबर १९६० मध्ये इमारतीची कोनशिला रोवण्यात आली.
• देशातील मुख्य शहरांत ज्यूस पाठविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, राजाश्रय न मिळाल्याने हा प्रयत्न फसला. सन १९९२ मध्ये सहकारी तत्त्वावर उभ्या राहिलेल्या सोपॅक प्राईव्हेट लिमिटेड कंपनीतून "सोपॅक" नावाने संत्रा रसाच्या बाटल्या बाजारात आल्या. केवळ राजकीय हेवेदाव्यात ही कंपनी बंद पडली.
• संत्रा उत्पादकांना न्याय मिळावा म्हणून तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी सन १९९५ मध्ये मोर्शीतील मायवाडी येथे नोगा शासकीय संत्रा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाचे तत्कालीन वित्तमंत्री रामराव आदिक यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले होते.
