कोल्हापूर : सुधारित आराखड्यानुसार शक्तिपीठ महामार्ग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील राधानगरी-गोवा टायगर कॉरिडॉरजवळून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ७३ गावांतून महामार्ग जाणार आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्यानुसार ६१ गावांतून हा महामार्ग जाणार होता. सुधारितमध्ये यात वाढ झाली आहे. बाधित गावांची संख्या वाढणार असल्याने नुकसानग्रस्त शेतकरी आणि क्षेत्रात वाढ होणार आहे.
शासनाने अंतिम आराखडा मंजूर केला तरी नुकसान भरपाई किती देणार, हे अजून जाहीर केलेले नाही. आता याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. राज्य शासनाचा ड्रीम प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा समोर आला आहे. या आराखड्यानुसार व्याघ्र प्रकल्पापासून महामार्ग जाणार असल्याने वाघांच्या अधिवासाजवळ वाहनांची वर्दळ वाढणार आहे.
पूर्वीच्या महामार्गाला तीव्र विरोध झालेली गावे वगळण्यात आली आहेत. सुधारित आराखड्यालाही शक्तीपीठ विरोधी कृती समितीने तीव्र विरोध दर्शवला आहे. यामुळे अंमलबजावणी यंत्रणा असलेली महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ सावध भूमिकेत आहे. त्यांनी अजूनही अधिकृतपणे आराखडा प्रसिद्धीस दिलेला नाही.
पणजीत शेवट
शक्तिपीठ महामार्ग पूर्वी नागपूरपासून सुरुवात होणार होता. सुधारितमध्ये यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र महामार्गाचा शेवट गोवा-पत्रादेवीऐवजी पणजी येथे होणार आहे
महामार्गात बाधित होणारी गावे
◼️ हातकणंगले : जुने पारगाव, नवे पारगाव. पन्हाळा : वारणानगर, बहिरेवाडी, जाखले, पोहाळे.
◼️ करवीर : केर्ली, केर्ले, पाडळी, निटवडे, शिंदेवाडी, खुपीरे, कापार्डे, कुडीत्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, हसूर दुमाला, भाटणवाडी.
◼️ राधानगरी : राशिवडे बुद्रूक, चंदे, येळवडे, कोदवडे, वाघवडे, मोहडे, कौलव, पिंपळवाडी, कुराडवाडी, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, मालवे.
◼️ कागल : बोरवडे, उंदरवाडी.
◼️ भुदरगड : नाथवडे, कोनवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, शेणगाव, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुलीं, मेघोली.
◼️ आजरा : हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, खानापूर, पोळगाव, एरंडोळ, मसोली, देऊळवाडी.
◼️ चंदगड : बुजवडे, गवसे, कुरणी, बिजूर, कानूर बु., कानूर खु., पिळणी, झांबरे धरण, इसापूर.
अधिक वाचा: इतिहासात प्रथमच मालदांडी ज्वारीला विक्रमी दर; वाचा प्रतिक्विंटल कसा मिळतोय दर?
