बकुळ वृक्ष (Mimusops elengi) हा एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. हा वृक्ष प्रामुख्याने भारतात विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतो.
बकुळच्या फुलांना सौम्य आणि सुखद सुगंध असतो त्यामुळे तो धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वापरला जातो. परंतु बकुळ फक्त सुगंधासाठीच नव्हे तर त्याचे औषधी उपयोगही खूप महत्त्वाचे आहेत.
बकुळच्या साली, पाने, फुले आणि फळांचा उपयोग आयुर्वेदात विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हा वृक्ष आयुर्वेदिक औषधांमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. जाणून घेऊया याच गुणकारी बकुळचे आरोग्यदायी फायदे.
दात आणि हिरड्यांसाठी उपयुक्त
बकुळच्या सालीमध्ये दंतविकारांवर गुणकारी असणारे घटक असतात. याच्या सालीचा काढा किंवा अर्क हिरड्यांमधून होणारे रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आणि तोंडातील व्रणांवर उपयोगी ठरतो. बकुळच्या सालीचा दंतमंजन किंवा अर्क नियमित वापरल्यास दात मजबूत होतात आणि तोंडातील दुर्गंधीही दूर होते.
पचनसंस्थेसाठी फायदेशीर
बकुळची साल अतिसार, जुलाब, पोटदुखी आणि आतड्यांतील कृमी यांवर उपयोगी आहे. बकुळच्या सालीचा काढा पिण्यामुळे पाचनक्रिया सुधारते. त्यामुळे हा काढा घरगुती उपाय म्हणून अनेकदा वापरला जातो.
मूत्रसंस्थेवर उपयुक्त
बकुळच्या सालीत मूत्रवर्धक गुणधर्म असतात. त्यामुळे लघवी करताना होणारी जळजळ कमी होते. मूत्राशयातील दाह किंवा संसर्ग असल्यास बकुळचा अर्क आराम देतो.
अँटिऑक्सिडंट गुणधर्म
बकुळच्या फळांमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि विविध प्रकारच्या ऍलर्जींच्यावर नियंत्रण मिळवता येते.
इतर औषधी उपयोग
बकुळची पाने डोकेदुखी, दातदुखी आणि विषारी प्रकरणांमध्ये उपयोगी ठरतात. पानांचा रस बाह्य वापरासाठी उपयुक्त असून सूज कमी करण्यासाठी वापरला जातो. काही पारंपरिक औषधांमध्ये बकुळचा उपयोग ताप कमी करण्यासाठीही केला जातो.
सुगंध आणि धार्मिक महत्त्व
बकुळची फुले अतिशय सुगंधी असतात. या फुलांचा उपयोग देवपूजेत धार्मिक विधींमध्ये आणि घरातील प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी केला जातो. फुले सुकवून ती चूर्ण स्वरूपात वापरली जातात.
वरील सर्व माहिती सामान्य माहिती असून अधिक माहितीसाठी आणि अतिरिक्त सेवन करण्याआधी आपल्या आरोग्य तज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.