सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५च्या ऊस हंगामासाठी टनाला ३,४०० रुपये अंतिम दर जाहीर केला आहे.
यापैकी टनाला २२६ रुपये आणि ठेवींवरील व्याजासह एकूण २९ कोटी रुपये सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
या हंगामात कारखान्याकडे १२ लाख २४ हजार ५२४ मेट्रिक टन ऊस गाळपासाठी आला होता. यापूर्वी सभासदांना टनाला ३,१७३ रुपये अदा करण्यात आले होते.
अंतिम दरानुसार, सोमेश्वर मंदिरासाठी टनाला १ रुपया विकास निधी वजा करून टनाला २२६ रुपये वितरित केले गेले. यात ऊस बिलापोटी २५ कोटी आणि ठेवींवरील व्याजाचे ४ कोटी रुपये यांचा समावेश आहे.
आडसाली उसाला टनाला ३,४०० रुपये, पूर्वहंगामी उसाला ३,४७५ रुपये आणि सुरू व खोडवा उसाला ३,५५० रुपये अदा करण्यात आले आहेत.
जगताप यांनी सांगितले की, येत्या गाळप हंगामात कारखाना १४ लाख टन ऊस गाळप करणार आहे. ३५ हजार एकर नोंदणीकृत क्षेत्रापैकी ३१,५०० एकरांतून सभासदांचा १२.५ लाख टन ऊस आणि १.५ ते २ लाख टन गेटकेन ऊस उपलब्ध होईल.
हंगामासाठी यंत्रणा सज्ज असून, प्रतिदिन ९,५०० टन क्षमतेने पाच महिन्यांत गाळप पूर्ण होईल. यासाठी २,२६० बैलगाड्चा, ६२० डम्पिंग ट्रॅक्टर, ३९१ ट्रॅक्टर आणि २० ट्रक यांचे करार पूर्ण झाले आहेत.
कारखान्याकडून प्रथमच २४ हार्वेस्टरशी करार
- मजुरांची टंचाई लक्षात घेता, कारखान्याने प्रथमच २४ हार्वेस्टरशी करार केले आहेत.
- हार्वेस्टरमुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन जमिनीचा पोत सुधारत असल्याचे जगताप यांनी नमूद केले.
- तसेच, शेतकऱ्यांनी पाच फुटी पट्टा पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
१ रुपया विकास निधी
कारखान्याकडे १२ लाख २४ हजार ५२४ मेट्रिक टन ऊस गाळपासाठी आला होता. यापूर्वी सभासदांना टनाला ३,१७३ रुपये अदा करण्यात आले होते. सोमेश्वर मंदिरासाठी टनाला १ रुपया विकास निधी वजा करून टनाला २२६ रुपये वितरित केले गेले.
अधिक वाचा: साखर उद्योगासाठी यंदा ६५० कोटी लिटर इथेनॉलचा कोटा देण्याचा निणर्य; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?