कृषि विभागातील योजनेतील गैरव्यवहार तसेच शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी बेकायदेशीरपणे सुरू केलेल्या कृषि निविष्ठा व उत्पादक कंपन्या व विक्री केंद्रे यांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक केली होती.
मा. विधानसभा सदस्य, श्री. सुरेश धस यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने आणि कृषि विभागाच्या विविध योजनांमधील गैरव्यवहारासंबंधी प्राप्त गंभीर स्वरुपाच्या इतर तक्रारींच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी करण्यासाठी डॉ. उमाकांत दांगट, भाप्रसे (सेवानिवृत्त) यांची विशेष चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
परंतु वरील तक्रारींमधील मुद्यांची व्याप्ती आणि शासनाचे काही उपक्रम व समित्यांवर कार्यरत असल्याने चौकशीच्या कामासाठी पुरेसा वेळा देऊ शकत नसल्यामुळे विशेष चौकशी अधिकारी म्हणून केलेली नेमणूक रद्द करण्याची विनंती डॉ. दांगट यांनी केली होती.
प्रस्तुत चौकशी प्रकरणी अन्य विशेष चौकशी अधिकारी यांची नियुक्ती करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. आता नवीन शासन निर्णयानुसार विशेष चौकशी अधिकारी म्हणून श्री. निरंजन कुमार सुधांशू (भाप्रसे), महासंचालक, यशदा, पुणे यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आयुक्त, कृषि यांच्यामार्फत विशेष चौकशी अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या सर्व चौकशी प्रकरणातील संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना विशेष चौकशी अधिकारी चौकशीसाठी बोलावू शकतात.
चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या अधिकारी/कर्माचारी यांनी चौकशीस उपस्थित राहणे तसेच, विशेष चौकशी अधिकारी यांनी मागितलेली माहिती/दस्तावेज उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील.
प्रस्तुत चौकशीच्या अनुषंगाने विशेष चौकशी अधिकारी यांना प्रचलीत नियमानुसार आवश्यक अनुषंगिक बाबी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही कृषि आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात यावी असे शासन निर्णयात नमूद केले आहे.
अधिक वाचा: राज्यात ४०० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होणार; काय आहे उपक्रम? कसा मिळणार लाभ?
