Join us

दुष्काळाची तीव्रता वाढणार; भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 17:30 IST

बंधारे, प्रकल्पात अत्यल्प जलसाठा :

अल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम असून, पाझर तलाव, गाव तलाव, मध्यम प्रकल्पासह सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा अत्यल्प झाल्याने दुष्काळाची दाहकता तीव्र होत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम अडचणीत सापडला आहे. तर येणाऱ्या दिवसांत तालुक्याला मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तालुक्यात यंदा सरासरीच्या अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. तर रब्बी हंगामावरही याचा परिणाम होणारआहे. अपुऱ्या पावसामुळे नदी, नाले कोरडेठाक पडले असून, प्रकल्पाची तहानही कायम आहे. तालुक्यात ११० पाझर तलाव असून, यातील पाणीसाठा सरासरी ७ टक्के आहे. तर २६ गाव तलावांत सरासरी केवळ ४ टक्के पाणी शिल्लक आहे.

एका सिंचन व एका साठवण तलावात केवळ ३ टक्के पाणी आहे. टेंभापुरी व शिल्लेगाव मध्यम प्रकल्पात अनुक्रमे १३ व शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या आकडेवारीनुसार एकंदरीत सर्वच पाणीसाठा अत्यल्प झाला आहे. तर अपेक्षित पाऊस न झाल्याने नदीवरील बंधारे पाण्यावाचून कोरडेठाक पडले आहेत.शिवना नदीत पाणी न आल्याने त्यावरील आठ कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक पडले आहेत. तालुक्यातील बहुतांश गावांना तलावातील उपलब्ध पाण्यावर पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अत्यल्प पाण्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

तलावाच्या कार्यक्षेत्रातील शेतीलाही याचा फटका बसणार असून, रब्बी पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांनी केलेल्या पाइपलाइनही कुचकामी ठरल्या असून, पिके वाळत आहेत, अनेक गावांतीलपाणीपुरवठा योजना बंद पडल्या असून, काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

पाणी झपाट्याने होणार कमी

* बाष्पीभवन व पाणी झिरपण्यामुळे आगामी काळात पाणीपातळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

* यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे.

* गोदावरी नदीत पाणी सोडल्यास व नामका कालव्याद्वारे पाणी आल्यास काही भागात पाणीटंचाईवर मात केली जाऊ शकते.

टॅग्स :पाणी टंचाईपाणीकपातधरणऔरंगाबादशेतकरी