नवनाथ जगदाळे
दहिवडी : माण तालुक्यात फळबाग क्षेत्रात वाढ होत चालली आहे. तसेच यामधून शेतकरी चांगले उत्पन्नही मिळवत आहेत.
अशाचप्रकारे तालुक्याच्या पश्चिम भागातील परकंदी या गावचे माजी सरपंच बाळकृष्ण कदम यांनी दीड एकर सीताफळ बागेमधून तब्बल साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे नवीन शेतकऱ्यांपुढे त्यांचा हा एक आदर्श निर्माण झालेला आहे.
परकंदी येथील माजी सरपंच बाळकृष्ण कदम यांची दोन्ही मुले व सुना नोकरी करतात. ते स्वतः शेती करतात. या शेतीमध्ये काम करताना मजुरांची अडचण निर्माण होते.
यामुळे त्यांनी फळबागा करण्याचा निर्णय घेतला. त्यातच पावसाची कमतरता असल्याने उन्हाळ्यामध्ये नेहमीच या भागाला पाण्याचीही टंचाई भासते. त्यामुळे त्यांनी अवघ्या दीड एकर क्षेत्रामध्ये सीताफळाची लागवड केली.
एनएमके गोल्डन या जातीची माळशिरसवरून ६०० रोपे २५ रुपयांप्रमाणे खरेदी केली. बहार धरताना तीन ते चारवेळा फवारणी केली. उत्कृष्ट प्रतीचे अन् कुजलेले शेणखत घातले. त्यानंतर ठिबकद्वारे पाण्याची व्यवस्था केली.
सीताफळाच्या या बागेमध्ये पहिल्या तोड्यात चार ते साडेचार टन उत्पादन निघाले. त्यानंतर दोन टन मिळाले. अशाप्रकारे एकूण साडेसहा टन उत्पादन मिळविण्यात यश आले.
बागेतील सीताफळे सांगोला येथील व्यापाऱ्याने बांधावरच खरेदी केली. साधारणतः १३० पासून १६५ रुपयांपर्यंत प्रति किलो दर मिळाला. त्यानंतर हे सीताफळ चेन्नही येथील बाजारपेठेत पाठवण्यात आले.
सीताफळाचा बहर धरण्यासाठी सर्व खर्च अवघा दीड लाख रुपये झाला. तर खर्च वजा जाता साडेसहा लाख रुपयांचे त्यांना उत्पन्न मिळाले आहे. त्यांची शेती इतरांना प्रेरणादायी ठरत आहे.
फळबागेचे एकूण क्षेत्र पाच एकर
◼️ बाळकृष्ण कदम यांचे एकूण पाच एकर फळबागेचे क्षेत्र आहे. यामध्ये डाळिंब, जांभूळ आणि सीताफळाची फळझाडे आहेत.
◼️ मजूर नसल्याने आणि शाश्वत असे उत्पन्न असल्याने फळबागेकडे वळल्याचे त्यांनी सांगितले.
◼️ त्यांच्या या प्रयोगाकडे पाहून अनेक शेतकऱ्यांनी आता सीताफळाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.
अलीकडील काळात प्रत्येक नोकरदार आहारामध्ये कोणते ना कोणते फळ वापरत असतो. त्यामुळे जीवनामध्ये फळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापुढे कोणतीही फळबाग असू द्या, त्याला निश्चितपणाने चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करीत असताना थोडीतरी फळबाग लागवड करावी, असे माझे आवाहन आहे. - बाळकृष्ण कदम, परकंदी
अधिक वाचा: बाजार कोसळलेल्या 'केळी'वर प्रक्रिया करून थेट विक्री; दोन एकरातून सव्वातीन लाखांची कमाई
