कोल्हापूर : उसाने यंदा शेतकऱ्यांना चकवले असून, सरासरी उतारा खाली आला, त्यात हंगाम उशिरा सुरू झाला आणि कर्नाटकातील कारखान्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर दिला.
याचा एकत्रित परिणाम हंगामावर झाला असून, सर्वच कारखान्याने उद्दिष्टाशिवायच बंद करावे लागले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ११ कारखाने बंद झाले असून, येत्या आठ दिवसांत उर्वरित कारखान्यांचा हंगाम संपणार आहे.
जिल्ह्यात उसाचे हेक्टरी उत्पादन राज्यात चांगले आहे. येथे सरासरी हेक्टर ९० ते १५० टनांपर्यत उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. १ कोटी ६० लाख टन उसाचे गाळप गेल्या वर्षी जिल्ह्यात झाले होते, यावर्षी ते १ कोटी ३५ लाखांवरच थांबणार आहे.
त्यामुळेच येथील २३ साखर कारखान्यांचे वर्षाला १ कोटी ६० लाख टनांपर्यंत गाळप होते मात्र, यंदा ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत एकसारखा पाऊस राहिल्याने उसाची वाढ खुंटली.
हंगामाच्या सुरुवातीपासूनच उसाला अपेक्षित उतारा मिळत नसल्याने कारखानदारांची चिंता वाढली होती. हेक्टरी ७० टनांपर्यतच उतारा गेल्याने कारखान्याची धुराडी लवकर बंद झाली. अपेक्षित गाळप न झाल्याने कारखान्यांसमोरील अडचणी वाढणार, हे निश्चित आहे.
यांचा हंगाम संपलाबिद्री, अर्थव (दौलत), नलवडे (गडहिंग्लज), छत्रपती राजाराम, अथणी शुगर्स (गायकवाड), सदाशिवराव मंडलिक, डी. वाय. पाटील, अथणी शुगर्स (तांबाळे), दालमिया (आसुर्ले-पोर्ले), संताजी घोरपडे, आजरा.
बेळगाव जिल्ह्यात दहा वर्षांत नऊ नवीन कारखानेकोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या बेळगाव जिल्ह्यात दहा वर्षांत नऊ नवीन साखर कारखाने सुरू झाले. त्यामुळे कर्नाटकातून येणाऱ्या उसावर यंदा मर्यादा आली आणि ते कारखाने लवकर बंद झाले.
महाराष्ट्रातील ऊस कर्नाटकाने पळविलामहाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साखर कारखानदार अडकल्याने हंगाम सुरू होण्यास २५ नोव्हेंबर उजाडला. पण, बेळगाव जिल्ह्यातील कारखाने ८ नोव्हेंबरलाच सुरू झाले होते. त्यात, सीमाभागातील कारखान्यांच्या बरोबरीने त्यांनी दर दिल्याने कर्नाटकातील ऊस महाराष्ट्रात आलाच नाही, पण, महाराष्ट्रातील ऊस कर्नाटकात मोठ्या प्रमाणात गेला. त्यामुळेच दोन महिन्यांतच त्यांनी १ कोटी गाळपाचा टप्पा पूर्ण केला होता.
तुऱ्यांनी ऊस झाला पोकळउसाच्या वाढीला पोषक असे वातावरण नसल्याने लवकर तुरे आले. आठ-दहा महिन्यांच्या लावणीला तुरे आल्याने ऊस पोकळ झाला होता. त्याचा फटका वजनाला बसल्याचे दिसून आले.
अधिक वाचा: सुरु उसात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी महत्वाच्या सात टिप्स; वाचा सविस्तर