सोलापूर : ऑगस्ट महिन्यात झालेले नुकसान क्षेत्र, खरीप, पालेभाज्या, वैरण आदीचे लागवड झालेले क्षेत्र व सप्टेंबर महिन्यात एकूणच पावसाने झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीचा ताळमेळ जमेना झाला आहे.
त्यामुळे दिवाळी आठवड्यावर आली असताना जिल्ह्यातील बाधीत क्षेत्राची माहिती अंतिम झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यात यंदा कोसळलेल्या जोरदार पावसाने सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस पडत राहिल्याने पीक नुकसान वरचेवर वाढत गेले आहे. मोठ्या प्रमाणावर पडलेला पाऊस, ओढे, नाले, नद्यांना आलेला पूर व पिकांत साठलेले पाणी यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास उशीर होत आहे.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे उरकले असले तरी त्याची गोळाबेरीज झालेली नाही. खरिपाचे झालेले पेरणी क्षेत्र, पालेभाज्या लागवड क्षेत्र, कांदा लागवड क्षेत्र, फळबागा क्षेत्र, खोडवा व नवीन लागवड झालेले ऊस क्षेत्र व नुकसान पंचनामे क्षेत्र यामध्ये तफावत असल्याचे सांगण्यात आले.
लागवडीखालील क्षेत्र व नुकसान पंचनामे क्षेत्राचा ताळमेळ बसेना झाला असल्याचे सांगण्यात आले. मग शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार का?
लागवाडीखालील क्षेत्र ११ लाख हेक्टर
◼️ जिल्हाचे भौगोलिक क्षेत्र १४ लाख ८४ हजार हेक्टर असून, लागवडीखालील क्षेत्र ११ लाख हेक्टर इतके आहे. साडेचार लाख हेक्टरवर खरीप पेरणी झाल्याची कृषी खात्याकडे नोंद आहे.
◼️ भाजीपाल्याचे एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र आहे, तर फळबागाचे एक लाख २९ हजार हेक्टर क्षेत्र आहे.
◼️ खोडवा दोन लाख बारा हजार हेक्टर तर नवीन ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची नोंद आहे.
◼️ चारा बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर आहे. कांद्याचे साधारण ५० हजार हेक्टर क्षेत्र असे एकूण साडेनऊ लाख क्षेत्र लागवडीखाली आहे.
◼️ नुकसान पंचनामे क्षेत्र व बाधित न झालेल्या क्षेत्राचा ताळमेळ बसणे आवश्यक आहे.
◼️ मात्र, बरेच शेतकरी पिकांची नोंद करीत नसल्याने लागवडीखालील क्षेत्र कमी दिसत आहे. यामुळेच कृषी खात्याला नुकसान क्षेत्र जुळवताना कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?
◼️ सरकारमधील मंत्री दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असे सांगत असले, तरी पीक नुकसानीची आकडेवारीवर अंतिम होत नाही.
◼️ याशिवाय पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीचे अद्यापही पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे दिवाळी अगोदर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार का?, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अधिक वाचा: Swabhimani Us Parishad : स्वाभिमानीची २४वी ऊस परिषद उद्या; 'या' दोन मुद्यांवर परिषद गाजण्याचे संकेत