तालुका कृषि विभाग नांदगाव (जि. नाशिक) व कृषि विज्ञान केंद्र वडेल (ता. मालेगाव) यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार (दि.१०) डिसेंबर रोजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत तृणधान्य व कडधान्ये पिके या विषयावर तालुका स्तरीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी न्यायडोंगरी प्रताप हाके, मंडळ कृषी अधिकारी मनमाड एकनाथ अंभुरे, विषय विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र वडेल रूपेश खेडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान तालुका कृषी अधिकारी रविंद्र डमाळे यांनी प्रास्ताविकात कृषि विभागाच्या महाडीबीटीवरील प्रलंबित सर्व योजनांचे अर्ज तपासणी करून पुर्व संमती सादर करावे व त्यानंतर खरेदी प्रक्रिया अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावे. महाविस्तार एआय ॲप डाऊनलोड करण्याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले.
तसेच कृषि विज्ञान केंद्राचे रूपेश खेडकर यांनी यावेळी पिक प्रात्यक्षिक प्रकल्प आधारीत पिके हरबरा, भुईमूग, सोयाबीन या पिकांचे लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया महत्व, पिकांचे विविध वाण, लागवडीचे अंतर, पिकाचे पाणी व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व किड व्यवस्थापन आदींविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा नांदगावचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक एस. टी. कर्नर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि विभागाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
