सोलापूर : एकामागून एक सोलापूर जिल्ह्यातील पाचवा साखर कारखाना ताब्यात घेण्याच्या तयारीत असलेल्या ओंकार ग्रुप तसेच लोकमंगल उद्योग समूहाने साखर कारखाने सुरू होऊन ३८ दिवस उलटले तरी ऊस दर जाहीर केला नाही.
दरही जाहीर केला नाही व पहिल्या १५ दिवसाचे ऊस बिलही काढले नसल्याने ऊस उत्पादकांमध्ये तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, लवंगी येथील भैरवनाथ शुगरने २८०० रुपये प्रति टन दर जाहीर केल्याने दर जाहीर करणाऱ्या कारखान्यांची संख्या १७ इतकी झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील स्वामी समर्थ सहकारी अक्कलकोट, संतनाथ वैराग, मकाई करमाळा तसेच आदिनाथ सहकारी हे चार साखर कारखाने यंदाही गाळप हंगाम सुरू करणार नाहीत.
उर्वरित ३६ पैकी इंद्रेश्वर शुगर उपळाई व मातोश्री लक्ष्मी शुगर अक्कलकोट हे दोन साखर कारखाने इतर ग्रुपकडे वर्ग करण्यात येत आहेत.
त्यामुळे हे साखर कारखाने उशिराने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. लोकशक्ती औराद तेरामैल हा साखर कारखाना सोमवारी सुरू होणार आहे.
उर्वरित ३३ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला आहे. २८०० ते ३००१ रुपये दर या साखर कारखान्यांनी जाहीर केला आहे.
शेतकरी संघटनांचा दर जाहीर करण्यासाठी वाढत असलेला दबाव व जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस दर जाहीर करण्यासाठी साखर कारखानदारांना दिलेला वेळ लक्षात घेता जिल्ह्यातील गाळप सुरू केलेल्या सर्वच कारखान्यांनी ऊस दर जाहीर करणे अपेक्षित होते.
मात्र हंगाम सुरू होऊन ३८ दिवस उलटल्यानंतरही १७ साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला आहे. जिल्ह्यात एकामागे एक असे पाच साखर कारखाने ओंकार ग्रुपने घेतले आहेत. लोकमंगल उद्योग समूहाचे दोन साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.
चार कारखान्याचे गाळप सुरु..
◼️ ओंकार ग्रुपचे जिल्ह्यात ओंकार चांदापुरी, ओंकार म्हैसगाव, ओंकार (व्ही.पी. १ जुना) शुगर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे व आता नव्याने मातोश्री लक्ष्मी शुगर हा पाचवा कारखाना होत आहे. चार साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरू असून मातोश्रीची प्रक्रिया सुरू आहे. असे असले तरी ऊस दर मात्र जाहीर केला नाही.
◼️ लोकमंगल उद्योग समूहाचे लोकमंगल अॅग्रो बीबीदारफळ व लोकमंगल को-जन भंडारकवठे हे दोन्ही साखर कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप घेत असले तरी ऊस दर मात्र जाहीर केला नाही.
◼️ लोकनेते बाबुराव पाटील व सिद्धनाथ शुगर तिन्हे हे माजी आमदार राजन पाटील व दिलीप माने यांचे कारखाने असून यांनीही ऊस दर जाहीर केला नाही.
अधिक वाचा: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत मोठा बदल; आता शेत रस्त्यांच्या कामांना येणार वेग
