ईश्वरपूर : राजारामबापू पाटील साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी साखराळे, वाटेगाव-सुरूल आणि कारंदवाडी युनिटकडे गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपये इतका दर निश्चित केल्याची माहिती कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी दिली.
माहुली म्हणाले, गेला हंगाम उसाच्या टंचाईमुळे १०० दिवसांच्या आत संपला. त्यामुळे साखर कारखानदारीसमोर काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्र सरकार साखरेचा किमान विक्री दर वाढवेल अशी अपेक्षा आहे.
तसेच गेल्या तीन वर्षांत इथेनॉलचे दरही वाढवले नाहीत. हे दरसुद्धा एफआरपीच्या प्रमाणात वाढवणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साखरेचा उतारा जास्त राहील असे गृहित धरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार ५०० रुपयेचा दर देण्याचे निश्चित केले आहे.
ते म्हणाले, राजारामबापू कारखान्याने गेल्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत नेहमीच उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम ठेवली आहे. कारखाना व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकरी व साखर कामगारांच्या हिताला सातत्याने प्राधान्य दिले आहे.
एकरी उत्पादन वाढवण्यासाठी अनेक योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवत आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी देऊन सहकार्य करावे.
अधिक वाचा: पीएम किसान योजेनेतून अडीच लाख शेतकऱ्यांना का वगळले? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
