वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये गळितास येणाऱ्या उसास प्रतिटन ३,५४४ रुपये अंतिम दर देणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे नेते व कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली.
गाळप झालेल्या उसास एकरकमी ॲडव्हान्स प्रतिटन ३,४२५ रुपये देणार असून उर्वरित प्रतिटन ११९ रुपये हंगाम समाप्तीनंतर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले.
गत हंगामात सरासरी १२.३६ साखर उताऱ्याला प्रतिटन ३,३९९ रुपये २८ पैसे दर मिळायला हवा. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून संचालक मंडळाने १४४ रुपये ७२ पैसे प्रतिटन जादा दर देण्याचा निर्णय घेऊन या हंगामात गाळपास येणाऱ्या उसास प्रतिटन ३,५४४ रुपये दर देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले.
आजपर्यंत सर्व ऊस उत्पादक सभासदांनी व गेटकेन ऊस उत्पादकांनी सुरुवातीपासून ऊस गळितास पाठवून सहकार्य केले आहे याबद्दल आमदार डॉ. कोरे यांच्यासह संचालक मंडळाने सर्वांचे आभार मानले.
चालू गळीत हंगामात यापुढेही सर्व सभासद व गेटकेन ऊस पुरवठादार यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस वारणा कारखान्यास पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन आमदार विनय कोरे यांनी केले.
यावेळी बैठकीस कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक शहाजी भगत, अधिकारी उपस्थित होते.
एफआरपीपेक्षा १४४ रुपये जादा दर...
यावर्षीच्या शेतकरी संघटना आणि शासन यांच्यात झालेल्या निर्णयाप्रमाणे एफआरपी अधिक १०० रुपये देण्यास मान्यता मिळाली होती. या धोरणाप्रमाणे वारणाची एफआरपी ३३९९ रुपये २८ पैसे इतकी होत असतानाही १४४ रुपये ७२ पैसे जादा दर जाहीर केला, तसेच सभासदांना प्रती महिना २ किलो साखर दोन रुपये किलो या अल्प दराने देण्याची वारणाची परंपरा यापुढे कायम राहणार आहे.
