कोल्हापूर: ऊसतोडीसाठी शेतकऱ्याला कशा पध्दतीने नागविले जात आहे, याची रसभरीत चर्चा 'लोकमत'च्या वृत्तामुळे साखर पट्टयात जोरदार सुरू आहे.
अनेक शेतकरी दूरध्वनी करून आपणास कसे लुटले, यंत्रणा कशी मुजोर आली आहे, ही प्रथा आमच्याकडे कशी वाढली आहे यावर आवाज उठवावा, असे आवर्जून सांगत होते. परंतु या सगळ्याला सर्वांत अगोदर कोण जबाबदार असेल तर शेतकरीच हे कटुसत्यही आपण स्वीकारले पाहिजे.
काही करून माझा ऊस लवकर तुटला पाहिजे, शेजारचा ऊस गेला... आमचा कधी जाणार..? मग गाठा ट्रॅक्टरवाल्याला व तो मागेल तेवढे पैसे देऊन ऊस तोडल्याचे समाधानच शेतकऱ्याला लुटीच्या खाईत लोटणारे ठरत आहे.
पैसे घेऊन आपण यंत्रणेच्या मागे लागायचे व नंतर चौकात बसून आम्हाला कोणी वालीच नाही, असे म्हणण्याला काडीचाही अर्थ नाही. 'उसाच्या फडावर खंडणीचा कोयता' या 'लोकमत'च्या वृत्तमालिकेमुळे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फुटली.
या लुटीबाबत शेतकरी आता तक्रार करण्यास पुढे येत आहेत. हा प्रश्न एका दिवसात निर्माण झालेला नाही, त्यामुळे एका दिवसात सुटणारही नाही. परंतु रान मोकळे करण्याचा नादच शेतकऱ्यांना अंगलट येत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे.
ऊसतोड हा काही राष्ट्रीय प्रश्न असल्यासारखे शेतकरी तोडकरी व ट्रॅक्टरवाल्यांच्या मागे लागतो. पैसे घ्या, जेवण घालतो, एन्ट्री देतो, वाहन अडकले तर जेसीबी आणतो.. असले लाड करायचे व नंतर ऊस शेती परवडत नाही म्हणायचे.
असे प्रकार गावागावात सुरू आहेत. शेतकरी जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत देव जरी आला तरी हा प्रश्न कायम राहणार आहे.
पेटवून द्या, मगच ऊस तोडतो
■ खंडणीचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर अनेक किस्से 'लोकमत'ला सांगण्यात आले. यात तुमच्या उसाचा पाला काढलेला नाही, तोडायला त्रास होतो.
■ त्यामुळे तुम्हीच ऊस पेटवून द्या, तरच आम्ही कोयता घालू, असे सांगणारे काही महाभाग आहेत. परंतु ऊस पेटविण्याच्या नादात शेजारचा फड पेटला तर त्याची भरपाई काय, घर विकून करू काय, असेही शेतकरी सुनावत आहेत.
ऊस काय स्ट्रॉबेरी आहे का?
■ लावण आडसाली असूदे की सुरू.. कारखाना सुरु झाला की शेतकऱ्याचं एकच मिशन असते ऊस घालविणे, जवळचा ऊस तुटला तर घरातील लोकही काही तरी करून घालवा अशा दुमदुम लावतात.
■ ऊस हे नाशवंत पीक नाही. दोन महिने जरी ऊस उशिराने तुटला तरी वजनात काही घट होत नाही, असे संशोधनातून समोर आले आहे. तरीही शेतकरी जणू काय स्ट्रॉबेरी लावल्यासारखे ऊस घालवण्यास धावाधाव करतो अन् खंडणीखोरांच्या कचाट्यात अडकतो.
शेतकरी ऊस तोडणार मग पैसे दुसऱ्याला का?
अनेक गावात आजही बैलगाडीने ऊस तोडून नेला जातो. परंतु बैलगाडी चालकासही माणसे मिळत नसल्याने तो शेतकऱ्यालाच ऊस तोडून ठेवायला सांगतो. पाच-दहा गुंठ्याचा शेतकरीही ही अट मान्य करतो. वाडेपण झाले व ऊसही गेला या खुशीत शेतकऱ्याचा तोडकरी होतो. पण तोडणीचे पैसे त्या बैलगाडीवाल्यालाच मिळतात. जर शेतकऱ्याने ऊस तोडला असेल तर त्याचे दामही त्यालाच मिळावे, असा सूरही व्यक्त झाला.
तालुकानिहाय ग्रुप हवा
शिरोळ तालुक्यात प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या निर्देशानुसार खुशाली रोखण्यासाठी व्हॉटसअॅप ग्रुप तयार केला आहे, परंतु गडहिंग्लजच्या शेतकऱ्याला तक्रार करायची असेल तो कशी करणार. यासाठी तालुकानिहाय असे ग्रुप तयार करून कारखान्यांचे कार्यकारी संचालक, शेती अधिकारी, संघटनांचे प्रतिनिधी, प्रगतिशील शेतकरी यांचा ग्रुप केला पाहिजे यासाठी साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी पुढाकार घ्यावा.
ऊस हे काही नाशवंत पीक नाही. थंडीच्या काळात म्हणजे साधारणः फेब्रुवारी महिना संपेपर्यंत उसाच्या वजनात विशेष फरक पडत नाही. त्यांनतर उष्णता वाढेल तशी साखरेची विघटन प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर वजन घटण्यास सुरुवात होते. पंरतु कारखाने सुरू झाल्यानंतर पहिले चार महिने तरी वजन टिकून राहते. - प्रताप चिपळूणकर, कृषी तज्ञ