राज्याच्या साखर उद्योगातील अग्रगण्य कारखाना असलेल्या चिमणगाव येथील Jarandeshwar sugar जरंडेश्वर शुगर मिल्सचा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू झाला आहे.
दर दिवशी १८ ते साडेअठरा हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले जात आहे. कारखान्याकडे गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०० रुपये दर देणार आहे,' अशी माहिती कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील अन्य सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या तुलनेत जरंडेश्वर शुगर मिल्सने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.
गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये १८ लाख ७१ हजार ४२४ टन ऊस गाळप करून कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता आलेल्या उसाला उच्चांकी असा ३१०० रुपयांचा दर दिला आहे.
जरंडेश्वर शुगर मिल्सने सातत्याने चांगला ऊसदर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस गाळप करून अल्पावधीतच साखर उद्योगात नावलौकिक मिळवला आहे.
कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याची २५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असताना अतिरिक्त उसाचे क्षेत्र व ऊस गाळपास घालवण्यासाठी उत्कृष्ट नियोजनाद्वारे कारखान्याचे विस्तारीकरण केले आहे.
जरंडेश्वर शुगर मिल्समार्फत ऊस तोडणी कार्यक्रम, उसास वेळेत तोड, योग्य दर, अचूक वजन काटे यासह ऊस विकास योजना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविल्या आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यास ऊस घालण्यास नेहमीच उत्सुक आहेत.
या सर्व योजना व्यवस्थापनामार्फत राबवल्या जात असल्याने कारखान्याबाबत ऊस उत्पादकांच्या मनात प्रचंड विश्वासार्हता निर्माण झाल्याचे दिसून येत असल्याचे सिनगारे यांनी सांगितले.
सिनगारे म्हणाले, 'जरंडेश्वर शुगर मिल्सने गेल्या १५ वर्षांत सामान्यातील सामान्य शेतकऱ्याला आधार देण्याचे काम केले आहे.
जरंडेश्वर शुगर मिल्सने गळीत हंगाम २०२४-२०२५ चे नियोजन अत्यंत काटेकोरपणे केले असून, कारखान्याकडे उसाची नोंद केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करण्यास जरंडेश्वर शुगर मिल्स कटिबद्ध आहे.
कारखान्याचा वजन काटा अचूक असून, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार, कर्मचाऱ्यांसह सर्व जणांना वेळेवर पेमेंट केले जात आहे. यावर्षीच्या गळीत हंगामासाठी रिकव्हरीच्या दृष्टीने चांगल्या प्रकारचा ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन सिनगारे यांनी केले आहे.
अधिक वाचा: पन्नास वर्षे झाली तरी साखर कारखाने अजून कर्जातच! असं कसं शक्य आहे; काय हाय विषय? वाचा सविस्तर