गोविंद शिंदे
मानार प्रकल्पाच्या पाण्यामुळे हजारो हेक्टरांवर शेतकरी उसाची लागवड करीत असले तरी नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यात एकही साखर कारखाना नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी गंभीर अडचणीत आले आहेत.
ऊस नेण्यासाठी शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांतील कारखान्यांकडे हेलपाटे मारावे लागत असून वेळेवर गाळप न झाल्यास आर्थिक नुकसान होणार आहे. १४६ दलघमी जलसाठा असलेल्या मानार प्रकल्पामुळे तब्बल २४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून तालुक्यातील शेती अर्थकारणात मोठी वाढ झाली आहे.
प्रकल्प उभारणीनंतर बहुतेक वर्षे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांनी बागायती शेतीकडे वळत ऊस व हळद या प्रमुख पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. सद्यःस्थितीत तालुक्यातील उसाचे क्षेत्र सुमारे ३ हजार हेक्टर तर हळदीची लागवड पाच हजार हेक्टर इतकी आहे.
कलंबर कारखाना २० वर्षांपासून बंद
• नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्याजवळ असलेला कलंबर साखर कारखाना २० वर्षापासून बंद आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा कारखाना पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. या कारखान्यावर शेकडो कामगारांचे रोजगार अवलंबून होते. कारखाना बंद झाल्याने उसाचे क्षेत्र घटले होते.
• मात्र अलीकडच्या काळात शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील व बाहेरील कारखान्यांशी संपर्क साधून पुन्हा ऊस लागवड वाढवली आहे. शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी गेल्या एका महिन्यापासून यंत्रणांची हालचाल सुरू झाली असली तरी ऊसतोड कामगारांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे उसाचा ट्रान्स्पोर्ट, मजूर टंचाई आणि गाळपाचा विलंबामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
परजिल्ह्यांतील कारखान्यांवर अवलंबित्व
• लातूर, परभणी, अंबाजोगाई तसेच जिल्ह्यातील इतर काही कारखाने मागील काही वर्षात गरजेनुसार शेतकऱ्यांचा ऊस घेत होते. प्रत्येक कारखान्याचा भाव एकसारखा नसल्याने शेतकऱ्यांना परिस्थितीनुसार कारखाने निवडावे लागत होते.
• सध्या मात्र विविध कारखान्यांकडून उसासाठी हमी दिली जात असली तरी तालुक्यातील हक्काचा कारखाना बंद असल्याचे वास्तव अजूनही कायम आहे. तीन दशकांपासून कारखाना सुरू होईल, अशी केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात काही घडले नाही.
दूरच्या कारखान्यांकडे ऊस
गेल्या वर्षापासून बारूळ, वळसंगवाडी, धर्मापुरी, चिंचोली, मानसपुरी, कवठा, शिरूर, तेलूर, पेठवडज, वरवंट, राहटी, जाकापूर, काटकळंबा, कळका, बोरी, वाखरड, मगनाळी, बाहाद्दरपूर, जंगमवाडी या गावांतील शेतकऱ्यांनी मानार प्रकल्पाच्या पाण्यावर उसाचे क्षेत्र वाढवले आहे.
