बारामती:बारामती आणि ऊस शेतीचे समीकरण सर्वत्र प्रसिध्द आहे. निरा डावा कालव्यावर येथील ऊस शेती बहरली आहे.
मात्र, बारामतीच्या जिरायती भागात निर्यातक्षम केळी लागवड यशस्वी करीत सातव कुटुंबियांनी या परीसरातील शेतकऱ्यांना शेतीची वेगळी वाट दाखवली आहे.
२३ महिन्यात केळी पिकांची दोन उत्पादने घेणे शक्य असल्याने ऊसशेतीच्या तुलनेने केळीलागवडीकडे कल वाढण्याचे संकेत आहेत.
माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, जयश्री सातव, त्यांचे थोरले सुपुत्र आणि बारामती बॅंकेचे चेअरमन सचिन सातव तसेच त्यांचे धाकटे सुपुत्र कारखान्याचे संचालक नितीन सातव यांनी ही किमया साधली आहे.
मागील वर्षी गणेशोत्सव दरम्यान गौरी आगमनाच्या दिवशी काेळोली येथे सातव कुटुंबियांनी केळीची पाच एकर लागवड केली. यामध्ये एकरी १२५० केळीच्या झाडांची ७ बाय ५ अंतरावर लागवड करण्यात आली.
त्यांनतर निर्यातक्षम केळी शेती शिकण्यासाठी प्रगत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भेटी देत माहिती घेतली. यामध्ये ठीबक सिंचनाचा वापर करीत पाणी आणि खत व्यवस्थापन सातव कुटुंबियांनी साधले आहे.
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये झालेले क्रांती बघून खूप प्रेरणा मिळाली. बारामती तालुक्यामध्ये ऊस लागण, खोडवा नंतर क्रॉप रोटेशन म्हणून केळी हा चांगला पर्याय पुढे येत आहे.
केळी पिक घेतल्यानंतर जमिनीचा पोत चांगल्या पद्धतीने सुधारतो.परीणामी त्यामध्ये घेतलेल्या ऊस पिकाचे उत्पन्न चांगले येत आहे. पणदरे पासून सुरू झालेली केळी शेती ही आता नीरावागजसह दुष्काळी पट्ट्यामध्ये जळगाव सुपे, सुपे परीसरात सुद्धा पोहचली आहे.
दिवसेंदिवस केळीचे क्षेत्र वाढत असल्याचे सचिन सातव यांनी सांगितले. पाणी व्यवस्थापन केल्यास जिरायती भागात देखील केळी सारखे नगदी पिक लागवड करणे शक्य असल्याचे सातव म्हणाले.
रविवारी (दि.१०) शेतातून केळीच्या पहिल्या पिकाचे बारामती पासून इराणला निर्यात झाली. हे सर्व पाहून आम्ही सातव कुटुंबीयांनी तीन पिढ्या शेतीमध्ये केलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याचे समाधान मिळाले.
पुढील वाटचालीस एक नवीन ऊर्जा मिळाली. निश्चितच या ऊर्जेतून अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आधुनिक शाश्वत शेती करण्यावर भर देण्याचा मानस आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस, फळबागा व इतर पिकांच्या आधुनिक शेती मध्ये बारामती पॅटर्न म्हणून पुढील काळात देशामध्ये नावलौकिक कमवेल अशी खात्री आहे.
शेतात सुरवातीला पपई, जांभुळसह विविध पिके लागवडीचे यशस्वी प्रयोग केले. आज आमच्या केळीची निर्यात झाल्यानंतर आई वडीलांनी केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे मनापासून समाधान आहे असे सातव म्हणाले.
बारामती तालुक्यात केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून अनुदान तत्वावर केळी लागवड सुरु आहे. त्यासाठी आपण अर्ज स्वीकारत आहोत. जवळपास २५० हेक्टर केळी लागवडीसाठी अर्ज आलेले आहेत. केळी पिकासाठी पाणी आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याची सोय करण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना आहे. त्यातून शेतीपिकांना पाण्याची सोय करणे शक्य आहे. - सचिन हाके, बारामती तालुका कृषि अधिकारी
अधिक वाचा: उसाच्या पट्ट्यात आले पिक बहरले; पाडेगावचे शेतकरी रमेश यांनी एकरात ११ लाख कमवले