खरीप हंगाम सुरू असतानाही पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतकरी मेहनतीने शेती करत आहेत. मात्र, याच दरम्यान गुजरातहून स्वस्त दरात कीटकनाशके आणण्याचे प्रमाण वाढले आहे.
जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यात काही शेतकरी थेट अंकलेश्वर, भरुच या गुजरात राज्यातील विविध परिसरातून औषधी मागवत असल्याचे समोर येत आहे. ही औषधी खासगी गाड्यांद्वारे किंवा एस.टी. पार्सलच्या माध्यमातून मागवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
गुजरातमधून मिळणाऱ्या औषधांचे दर तुलनेत कमी असल्यामुळे अनेक शेतकरी त्याकडे आकर्षित होत आहेत. मात्र या औषधांवर योग्य लेबल-क्लेम, उत्पादक व विक्रेत्याची माहिती नसते, तसेच ती नोंदणीकृतही नसण्याची शक्यता असते.
अशा दर्जाहीन औषधांमुळे पिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
तुलनेने दर कमी
गुजरातमध्ये मिळणाऱ्या औषधांचे दर कमी आहेत. त्यामुळे शेतकरी कमी दरातील हे औषध घेण्यास उत्सुक आहेत. मात्र त्या विक्रेत्यांची नोंदणी नसल्याने दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
'बळी पडू नका'
कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत व परवाना धारक विक्रेत्याकडूनच औषधे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. फसव्या जाहिरातींना बळी न पडता, शंका असल्यास कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. तसेच औषध खरेदी करताना पक्के बिल घेणे आवश्यक आहे.
जळगाव जिल्ह्यातील काही शेतकरी सध्या परराज्यातून स्वस्त दरात किटकनाशके खरेदी करत असल्याचे आढळून येत आहे. मात्र ही कीटकनाशके अनेकदा नोंदणीकृत नसतात, त्यावर योग्य लेबल-क्लेम नसतो, तसेच उत्पादक व विक्रेत्याची स्पष्ट माहितीही उपलब्ध नसते. अशा उत्पादनांचा वापर केल्यास पिकाचे आरोग्य धोक्यात येते आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढते. याशिवाय, या खरेदीवेळी पक्के बिल न घेतल्यास, भविष्यात पिकांचे नुकसान झाल्यास कायद्याच्या चौकटीत नुकसानभरपाई मागणे शक्य होत नाही. - पद्मनाभ म्हस्के, भरारी पथक प्रमुख.
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी