छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था (सीएसएमएसएस) कृषी महाविद्यालय, कांचनवाडी येथील विद्यार्थ्यांनी "युनिटी फॉर सॉईल" या मोहिमेअंतर्गत अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांनी निधी संकलन करून जीवनावश्यक वस्तूंसोबत शालेय साहित्याचे किट वितरित केले.
"मदत नाही, आपलं कर्तव्य!" या भावनेने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि एकतेचं उत्तम उदाहरण समोर आणले. ही मदत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मायगाव (ता. पैठण) येथील पूरग्रस्त कुटुंबांना दिली गेली. यामध्ये अन्नधान्य, साखर, तेल, रवा, पोहे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंबरोबरच विद्यार्थ्यांसाठी वही, पेन्सिल, पुस्तके इत्यादी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. सरपंच किशोर दसपुते, अमोल गिरगे, अर्जुन दसपुते, सचिन दसपुते, सचिन ढुरकुळे, नंदू दसपुते आणि इतर गावकऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली.
या मोहिमेची माहिती सोशल मीडियाद्वारे आजी-माजी विविध भागात कार्यरत तसेच परदेशात असलेले विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे ते सुद्धा या उपक्रमाशी जोडले गेले. आपली माती आणि समाजाशी असलेली नाळ जपत, त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला.
दरम्यान या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकवर्ग यांचा मोलाचा सहभाग आणि प्रोत्साहन मिळाले. "जेथे समस्या, तिथे उपाय – कृषी विद्यार्थी सदैव सहाय्य!" या ब्रीदवाक्याने प्रेरित या मोहिमेमुळे समाजात सकारात्मकता, ऐक्य आणि संवेदनशीलतेचा संदेश प्रसारित झाला.
हेही वाचा : "मायक्रोग्रीन्स" घरच्या घरी उगवता येणारी सुपरफूड पालेभाजी