नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्याच्या सीमेजवळ, सप्तश्रृंगगडाच्या अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याशी वणी-नांदुरी मार्गावर, सापुतारा-वणी महामार्गालगत असलेल्या दरेगाव, पांडणे, अहिवंतवाडी, पिंप्री अंचला भागात स्ट्रॉबेरी शेती जोमाने फुलू लागली आहे.
परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी लागवड करण्यास सुरुवात केली असून, यंदा दरेगावातच जवळपास ८० टक्के शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीकडे वळल्याची स्थिती दिसत आहे. नांदुरी ते पावरपाडा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्ट्रॉबेरीचे हिरवेगार मळे नजर खिळवून ठेवत आहेत.
परराज्यात वाढती मागणी
गुलाबी व गोड-आंबट चवीच्या स्ट्रॉबेरीची मागणी केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर मुंबई, पुणे, सुरत, नवसारी, वलसाड, बडोदा, अहमदाबाद, दिल्ली अशा शहरांतही मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक शेतकरी आपले उत्पादन थेट बाजारात पाठवत आहेत.
रस्त्यालगत थाटले विक्री स्टॉल
स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाल्याने वणी-नांदुरी व सापुतारा मार्गावर लहान मोठे स्ट्रॉबेरी स्टॉल्स उभारले आहेत. पर्यटक याठिकाणी थांबून स्ट्रॉबेरी खरेदी करीत असल्याने विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत आहे. ग्रामीण भागात थेट विक्रीचा नवा व्यवसाय आकार घेत आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक हातभार
हिवाळ्याच्या दिवसांत बहरणारे स्ट्रॉबेरीचे हे नगदी पीक शेतकऱ्यांना लाभदायी ठरत आहे. चांगला परतावा देत असल्याने डोंगरकुशीतील जीवनमान उंचावण्यास हातभार लागत आहे. यामुळे अनेक कुटुंबांना रोजगार, तरुणांना, महिलांना उद्योग मिळत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळत आहे.
शेतीसाठी शासनाने प्रोत्साहन द्यावे
स्ट्रॉबेरी शेती वाढत असली तरी मार्गदर्शन, प्रशिक्षण व लागवडीसाठी रोपे उपलब्ध होणे गरजेचे असल्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. बाजारपेठ साखळी विकसित करणे, सन्मान योजनेत समाविष्ट करावा मागणी होत आहे.
हेही वाचा : एक एकर टोमॅटो शेतीतून ६ महिन्यांत ९ लाखांचा नफा; सुलतानवाडीतील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग
