Join us

Someshwar Sakhar Karkhana : सोमेश्वर कारखाना शिल्लक असणाऱ्या संपूर्ण उसाचे गाळप आणि पेमेंट वेळेत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 15:12 IST

सोमेश्वर कारखाना शिल्लक असणाऱ्या संपूर्ण उसाचे वेळेत गाळप करण्यासाठी व आपला हंगाम साधारणतः १८ ते २० मार्चपर्यंत संपविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याने सभासद बांधवांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये.

सोमेश्वरनगर: सोमेश्वर कारखाना शिल्लक असणाऱ्या संपूर्ण उसाचे वेळेत गाळप करण्यासाठी व आपला हंगाम साधारणतः १८ ते २० मार्चपर्यंत संपविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याने सभासद बांधवांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले.

जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री व कारखान्याचे मार्गदर्शक अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

कारखान्याने आजअखेर ७४ दिवसांमध्ये ६ लाख ७५ मे. टन उसाचे गाळप केले असून यामधून सरासरी ११.३४ टक्के साखर उतारा राखत ७ लाख ६३ हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले.

आपल्या कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ७५०० मे. टन प्रतिदिन असताना देखील प्रति दिवस ९ हजार १३४ मे. टनाच्या उच्चांकी सरासरीने आपण गाळप करीत आहोत.

तसेच आपल्या कारखान्याच्या को-जन प्रकल्पामधून ४,४९,५९,९६३ युनिट्सची वीजनिर्मिती केली असून २,४८,६२,५७२ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे.

त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पातून ३३,४०,८०३ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून सोबत २०,९३,१९१ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे.

१५७ कोटी ३६ लाख रुपये उत्पादकांना अदा १) कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील कारखान्यांनी राज्यभरात ऊस कमतरता असल्यामुळे जास्तीचा ऊस मिळविण्यासाठी एकरकमी दर देण्याच्या उद्देशाने पहिला हप्ता जाहीर केला असून त्यांचे अंतिम ऊस दराबाबत निश्चित धोरण दिसत नाही.२) या उलट आपला कारखाना पहिली उचल प्रति मे. टन २८०० रुपये सभासदांच्या खात्यावर पंधरवडा संपताच वर्ग करीत आहोत. आजअखेर ५ लाख ६२, हजार २ मे. टन उसासाठी रक्कम १५७ कोटी ३६ लाख ऊस उत्पादकांना अदा करण्यात आलेली आहे.३) त्याचबरोबर गाळपास येणाऱ्या पूर्व हंगामी उसास प्र.मे. टन ७५ रुपये, सुरू व खोडवा उसास प्र.मे. टन १५० रुपये याप्रमाणे अनुदान सभासदांच्या खात्यावर रक्कम वर्ग होईल.४) हंगाम संपल्यानंतर एफ.आर.पी. प्रमाणे उर्वरित साधारणतः प्र.मे. टन ३५० रुपये असे एकूण प्र.मे. टन ३ हजार १५० रुपये व त्यापुढेही जाऊन गेली अनेक वर्षे उच्चांकी दर देण्याची पंरपरा आहे ती या हंगामातही आपण कायम राखणार आहे.

उसतोडीसाठी पैसे मागितल्यास लेखी तक्रार करा. सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासदांचा ऊस तोडण्यासाठी उसतोडणी कामगारांकडून पैशांची मागणी केली जाते. असे पैसे मागितले असतील तर त्याची लेखी तक्रार कारखान्याकडे करावी. कारखाना ती रक्कम ऊसतोडणी कामगाराच्या ऊस वाहतूक बिलातून वसूल करून ती सभासदांना दिली जाईल. - पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना 

अधिक वाचा: Sugar Production 2024-25 : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात घट; आत्तापर्यंत किती साखर उत्पादन?

टॅग्स :साखर कारखानेऊसबारामतीशेतकरीशेतीकोल्हापूरसांगलीपुणे