सोमेश्वरनगर : चालू गळीत हंगामात राज्यासह जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखान्यांनी वाढवलेल्या स्वतःच्या गाळप क्षमतेमुळे या हंगामात उसाची पळवापळवी होण्याची चिन्हे आहेत.
वाढवलेल्या गाळप क्षमत्यामुळे चालू हंगामात जिल्ह्यातील साखर कारखाने मार्च महिन्यातच बंद करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजअखेर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सरासरी सव्वा आठचा साखर उतरा ठेवत २९ लाख ३३ हजार ७२० टन ऊस गाळप करत २४ लाख २१ हजार ४२० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेतले आहे.
ऊस गाळपास खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे, तर साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांनी बाजी मारली आहे. ऊस गाळपात बारामती अॅग्रोने तर साखर उताऱ्यात माळेगाव साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे.
मात्र सहकारी कारखान्यांच्या भोवती असणाऱ्या सर्वच खासगी कारखान्यांनी स्वतःची गाळप क्षमता वाढवली असून कार्यक्षेत्राची मर्यादा ओलांडून जादा ऊसदराचे आमिष दाखवत कारखाने एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळवतानाचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यात बारामती अॅग्रो व दौंड शुगर या खाजगी कारखान्यांनी पाच लाख गाळपाचा टप्पा ओलांडला आहे.
जिल्ह्यातील बारामती अॅग्रोने ६ लाख ५८ हजार मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख ७२ हजार क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेतले आहे.
त्या खालोखाल दौंड शुगरने ५ लाख ४० हजार मे. टन उसाचे गाळप करून ३ लाख ८३ हजार पोत्याचे उत्पादन घेतले आहे तर २ लाख ७२ हजार मे. टन उसाचे गाळप करून २ लाख ७८ हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेत सोमेश्वर कारखाना तिसऱ्या क्रमांकावर आहे.
खासगी साखर कारखान्यांनी जरी गाळपात आघाडी घेतली असली तरी साखर उताऱ्यात मात्र सहकारी साखर कारखाने आघाडीवर आहेत.
१०. ४५ टक्केचा साखर उतारा ठेवत माळेगाव कारखाना आघाडीवर असून त्या खालोखाल १०.३९ टक्केचा साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखाना तर १०.२६ चा साखर उतारा ठेवत छत्रपती कारखाना तिसऱ्या क्रमांकावर आहे.
थंडी फायद्याचीच
◼️ १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी हा 'हाय रिकव्हरी पिरेड' म्हणून ओळखला जातो. या कालावधीत उसाचे वजन वाढून शेतकऱ्यांना फायदा होतो.
◼️ याच कालावधीत उसातील गोडवा वाढल्याने परिणामी साखर उतारा वाढतो. आणि साखर उतारा वाढल्याने साखर कारखान्यांसह ऊस उत्पादकांना याचा फायदा होतो.
'सोमेश्वर 'कडून अनुदान
◼️ ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याने उशिरा तुटणाऱ्या उसाला अनुदान जाहीर केले आहे.
◼️ फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या उसाला प्रतिटन १०० रुपये, मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला २०० रुपये आणि एप्रिलमध्ये तुटणाऱ्या उसाला ३०० रुपये अतिरिक्त मिळणार आहेत.
४ लाख पोती उत्पादन
◼️ जिल्ह्यातील साखर कारखान्यात बारामती अॅग्रो व दौंड शुगर या खाजगी कारखान्यांनी पाच लाख गाळपाचा टप्पा ओलांडला आहे.
◼️ जिल्ह्यातील बारामती अॅग्रोने ६ लाख ५८ हजार मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख ७२ हजार क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेतले आहे.
अधिक वाचा: भोगावती साखर कारखान्याची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; प्रतिटन कसा दिला दर?
