Join us
Daily Top 2Weekly Top 5

Solpaur Jowar : ज्वारीच्या कोठाराला पुराचा फटका; यंदा ज्वारी तब्बल एक लाख हेक्टरने घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:29 IST

solapur jowari अतिवृष्टी, पूर व उशिरापर्यंत पाऊस पडल्याने जिल्ह्यात ज्वारीचा पेरा सरासरीपेक्षा एक लाख हेक्टरने घटला असून मका व हरभऱ्याची पेरणी जोमात सुरू असल्याचे दिसत आहे.

सोलापूर : अतिवृष्टी, पूर व उशिरापर्यंत पाऊस पडल्याने जिल्ह्यात ज्वारीचा पेरा सरासरीपेक्षा एक लाख हेक्टरने घटला असून मका व हरभऱ्याची पेरणी जोमात सुरू असल्याचे दिसत आहे.

रब्बी हंगामात सव्वातीन लाख हेक्टर म्हणजे सरासरीच्या ७४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा मे महिन्यापासून पडणाऱ्या पावसामुळे खरीप पेरणी सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर झाली; मात्र नंतर सतत पाऊस पडत राहिल्याने जमिनीतील ओल काही हटली नाही.

उशिरापर्यंत जोरदार पाऊस पडत राहिल्याने रब्बी पेरणीही लवकर करता आली नाही. उशिराने पेरणीला जमीन आल्याने ज्वारी पेरणी क्षेत्र घटले आहे.

जिल्ह्याचे ज्वारी पेरणी क्षेत्र सरासरी ३ लाख ७५ हजार हेक्टर असताना प्रत्यक्षात पेरणी २ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा एक लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी कमी झाली आहे. यावरून ज्वारी पेरणी क्षेत्र दरवर्षी घटत असल्याचे दिसत आहे.

त्या पटीत जमिनीतील ओल कमी होऊन वापसा येईल, तशी पेरणी केली जात असून हरभरा व मका क्षेत्र वाढत आहे. गव्हाची पेरणीही केली जात असली तरी त्या पटीत गव्हाला प्राधान्य दिसत नाही.

जमिनीला वापसा येईल तसे कांदा लागवड क्षेत्रही वाढत आहे. मका व हरभऱ्याप्रमाणे कांदा लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्याचे रब्बी पेरणीचे सरासरी क्षेत्र ४ लाख ४३ हजार हेक्टर असून प्रत्यक्षात पेरणी ३ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.

सरासरी क्षेत्राच्या ७४ टक्के इतकी पेरणी झाली असली तरी जानेवारीपर्यंत पेरणी सुरूच राहणार असल्याने रब्बी हंगामात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होण्याचा कृषी खात्याचा अंदाज आहे.

पेरणी क्षेत्र दृष्टिक्षेप◼️ माळशिरस, बार्शी तालुक्यात सरासरी क्षेत्राचा विचार केला असता रब्बीची सर्वाधिक पेरणी झाली आहे.◼️ माढा तालुक्यात सर्वात कमी अवधी ५७ टक्क्यांपर्यंत पेरणी झाली तर पंढरपूर तालुक्यात ६४ टक्के रब्बी पेरणी झाली आहे.◼️ सांगोला, माढा, करमाळा, पंढरपूर या तालुक्यात ज्वारीची सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.◼️ बार्शी तालुक्यात उद्दिष्टापेक्षा अधिक उत्तर व माळशिरस तालुक्यात सरासरीपर्यंत तर मंगळवेढा तालुक्यात अवघी ५२ टक्क्यांपर्यंत ज्वारीची पेरणी झाली आहे.

उशिरापर्यंत पाऊस पडल्याने ज्वारी पेरणी करता आली नाही. पर्यायाने ज्वारी पेरणीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी उशिराने पेरणी झालेली उगवण झाली नाही. ज्वारी ऐवजी गहू, हरभरा व मका पेरणी होत आहे. एकूण रब्बी पेरणी सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर होईल. - शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

अधिक वाचा: पूरबाधित शेतकऱ्यांच्या चालू कर्जाचे पुनर्गठन होणार; कर्ज माफीची संधी मिळणार का?

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Jowar Crop Hit by Floods; Sowing Down This Year

Web Summary : Heavy rains in Solapur caused a significant drop in Jowar sowing, down by one lakh hectares. Farmers are shifting to maize and gram cultivation. Overall Rabi sowing is at 74%, with expectations of increased planting by January.
टॅग्स :ज्वारीपेरणीसोलापूरशेतकरीशेतीपीकहरभरारब्बीरब्बी हंगामपूरमकाकांदा