संताजी शिंदेसोलापूर : सोलापूर मध्य रेल्वे विभागाने जिल्ह्यातील साखर, गूळ, सिमेंटसह खनिजांची निर्यात केल्याने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४२१.५६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.
सोलापुरातील साखर उत्तराखंड राज्यातील रूरकी, तामिळनाडू राज्यातील सेलम येथे पाठवली होती. गूळ आसाममधील नवीन तिनसुकिया आणि लंका येथे पोहोचविण्यात आला आहे. मंगळवारी माहिती देण्यात आली.
सोलापूर मध्य रेल्वे विभागाच्या वतीने जिल्ह्यातील माल अन्य जिल्ह्यात व परराज्यात पोहोचवण्यासाठी गुडशेड उभारले आहेत.
विभागाअंतर्गत लातूर, सोलापूर, ताजसुलतानपूर, पंढरपूर, आरग, भिगवण, कुडुवाडी, उस्मानाबाद, बाळे, वाडी आणि तिलाटी असे ११ मालधक्के आहेत.
रेल्वे विभागाने दिलेल्या या सेवेमुळे जिल्ह्यातील व विभागातील शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
ही निर्यात तत्कालीन सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक लखन झा, सध्याचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक ए. के. यादव, मुख्य वाणिज्यिक निरीक्षक दीपक मिश्रा, वाणिज्य निरीक्षक निहाल सिंग यांच्या नियंत्रणाखाली पार पडल्याचे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी सांगितले.
निर्यात झालेला मालसोलापूर मध्य रेल्वे विभागाने वर्षभरात सिमेंट, क्लिंकर, साखर, गूळ, डी-ऑइल केक, पेट्रोलियम, तेल आणि वंगण, मोलॅसिस, खते, चुनखडी, अन्नधान्य, कोळसा, राख, जिप्सम, बॉक्साइट असा माल निर्यात केला आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ चे ठळक मुद्दे◼️ 'आयओसीएल' पाकणी येथे २८ जानेवारी २०२५ रोजी 'पीओएल' वाहतूक सुरू झाली, त्यात ३.०१ कोटीचा महसूल मिळाला.◼️ पंढरपूर आणि बाळे येथे गूळ निर्यातीमधून २.७० कोटी मिळाले.◼️ गूळ वाहतूक ही ११ रॅकवर वाढली, त्यातून ५.१६ कोटीचे उत्पन्न मिळाले.◼️ कुर्डूवाडी आणि पंढरपूर ते कोकण रेल्वेमध्ये वेर्णा येथे पहिल्यांदाच खत भरण्याचे काम झाले. २ मिनी रॅक भरून ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.◼️ साखर-गुळाची पहिली एकत्रित वस्तू वाहतूक यशस्वीरीत्या पूर्ण झाली, लातूर येथून २ रॅक भरून १.५९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
आढावा निर्यातीचा◼️ एकूण उत्पन्न : ४२१.५६ कोटी◼️ एकूण रॅक लोड : १,७८३◼️ एकूण मालवाहतूक : ५.३४ दशलक्ष मेट्रिक टन
जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी यांना कमी किमतीमध्ये त्यांचा माल बाहेरगावी पोहोचवण्याची संधी आहे. रेल्वेच्या सेवेचा लाभघ्यावा. - योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक
अधिक वाचा: ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पास मुदतवाढ; यंदा किती कोटींची तरतूद? वाचा सविस्तर