अरुण बारसकर
सोलापूर : जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढ्याची ओळख असली तरी यंदा बार्शी तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सव्वादोन लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.
सोलापूर जिल्हा हा रब्बीचा व त्यातही ज्वारीचे उत्पादन घेणारा जिल्हा अशी ओळख आहे. मागील काही वर्षांत रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रातही घट होत आहे. जिल्ह्यात मंगळवेढ्याच्या ज्वारीची तारीख सर्वत्र केली जाते.
दमदार जमिनीत एकदा पेरणी केली की काढणीलाच जावे लागते, असे ज्वारीचे उत्पादन होते. मात्र अलीकडे पाण्याची सोय असल्याने ऊस व बागायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र वरचेवर कमी होत आहे.
जिल्ह्यात यंदा ज्वारीचे पेरणी क्षेत्र बार्शी तालुक्यात सर्वाधिक आहे. आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ५६ हजार १५६ हेक्टर ११८ टक्क्यांपर्यंत ज्वारी पेरणी बार्शी तालुक्यात झाली आहे. तुलनेत मंगळवेढा तालुक्यात १९ हजार ५७३ हेक्टर क्षेत्रावर ५५ टक्के इतकी पेरणी झाली आहे.
सोलापूर जिल्हा रब्बी पेरणीवर दृष्टिक्षेप
- जिल्ह्याचे ज्वारी पेरणी क्षेत्र तीन लाख १८ हजार हेक्टर इतके असून, आतापर्यंत दोन लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर ७३ टक्क्यांपर्यंत पेरणी झाली आहे.
- बार्शी तालुक्यात सर्वाधिक त्यानंतर अक्कलकोट तालुक्यात ३२ हजार ४९२ हेक्टर, करमाळ्यात २६ हजार हेक्टर, सांगोला तालुक्यात २१ हजार ४८५ हेक्टर, माढ्यात २० हजार हेक्टर तर इतर तालुक्यात त्यापेक्षा कमी क्षेत्रावर ज्वारी पेरणी झाली आहे.
- जिल्ह्यात गव्हाची पेरणी ३८ हजार हेक्टर, मका ५० हजार हेक्टर, हरभरा ५६ हजार हेक्टर, करडई ९१५ हेक्टर, सूर्यफूल ११८५ हेक्टर तसेच इतर तृणधान्य, कडधान्य असे एकूण तीन लाख ७८ हजार म्हणजे ८२ टक्क्यांपर्यंत रब्बी पेरणी झाली आहे.
ज्वारी काढणीसाठी मजूर मिळत नसल्याची अडचण आहे. बार्शी व इतर ठिकाणी शेतकरी ज्युट ज्वारी पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. मालदांडीचे क्षेत्रही बऱ्यापैकी आहे. दगडी ज्वारीची पेरणी काही शेतकरी करतात. सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र चांगले रस्ते असल्याने हुरड्याचे क्षेत्रही वाढतेय. - शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी