टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील दहिगाव येथे सध्या सीडलेस लिंबूंची फळबाग फळांनी लगडली असून, संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरलेल्या या लिंबू बागेतून सध्या एका तोडणीत ४०० क्विंटल लिंबू काढले जात आहेत. परिसरात सध्या या लिंबू बागेची चर्चा सुरू आहे.
येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकरराव लहाने यांनी आपल्या शेतीत लिंबू फळबागेचा हा अभिनव उपक्रम राबवला आहे. या बागेला रशिया येथील एका उद्योजक शेतकऱ्याने भेट देऊन बागेचे कौतुक केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक लहाने हे निवृत्तीनंतरचा आपला पूर्णवेळ शेतीसाठी देत आहेत. त्यांनी आतापर्यंत शेतीत अनेक नवनवीन प्रयोग केले आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी त्यांनी पावणेतीन एकर क्षेत्रात २ हजार सीडलेस लिंबूंची झाडे लावली. मागील दोन वर्षांपासून या बागेत लिंबू निघत आहेत. मात्र, यावर्षी प्रथमच ही फळबाग लिंबूंनी पूर्णतः लगडली आहे. सध्या या बागेतून एका तोडणीत जवळपास ४०० क्विंटल माल काढला जात आहे.
प्रयोग प्रथमच करून पाहिला
लिंबूचे मार्केट सुरतमध्ये असल्याने ट्रान्सपोर्टिंग खर्च जास्त येतो. पावसाळा आणि हिवाळ्यात लिंबूला फारसा भाव नसला तरी उन्हाळ्यात लिंबूला चांगला भाव मिळतो. या फळबागेसाठी सातत्य ठेवले तर लिंबू फळबाग बऱ्यापैकी नफा देऊन जाते. शिवाय या फळबागेत पपई, टोमॅटो, मका आदी मिश्र पीकही घेतो. त्यातूनही चांगले उत्पन्न मिळते. - शंकरराव लहाने, लिंबू उत्पादक शेतकरी, दहिगाव
हे ही वाचा सविस्तर : Sweet Orange : मोसंबी उत्पादक फळगळ अन् कोळी रोगाच्या कचाट्यात; असे करा उपाय