सगरोळी/नांदेड : शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची थेट उत्तरे शास्त्रज्ञांनी देत त्यांच्या शंका समाधान करता यावे, या उद्देशाने केव्हीकेने सुरू केलेल्या शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन आज सोमवार (दि.१०) लालवंडी (ता. नायगाव) गावात करण्यात आले होते.
या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी माती परीक्षण, फळबाग लागवड, पोकरा योजना, हळद लागवड, जनावरांचे आजार व उत्तम दुग्धव्यवसायासाठी करावयाच्या विविध योजना, गांडूळखत निर्मिती इत्यादी संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले आणि त्यांच्या शंका शास्त्रज्ञांनी समर्पक उत्तरे देऊन दूर केल्या.
तसेच शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेण्यासाठी केव्हीकेने एक कॅम्प आमच्या गावी घ्यावा अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सदरील सुसंवाद कार्यक्रमाचा उद्देश फक्त शंका समाधान करणे नसून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि योजनांची माहिती अधिक प्रभावीपणे व समग्रपणे मिळवून देणे आहे.
तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी केव्हीके आणि शेतकरी यांच्यातील सुसंवाद अधिक सुदृढ करण्याचे ध्येय असल्याचे यावेळी केव्हीकेच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना पटवून सांगितले.
या कार्यक्रमासाठी कपिल इंगळे, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. कृष्णा आंभुरे, डॉ. निहाल मुल्ला, डॉ. प्रवीण चव्हाण व लालवंडी गावचे सरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बालाजी चंदापुरे व प्रभुदास उडतेवार व सर्व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.