सहदेव खोत
सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात कष्टाने वाढविलेल्या भात पिकाला समाधानकारक उतारा असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. तालुक्यात शिराळी मोठे या स्थानिक वाणाबरोबरच कोमल, रत्ना १, रत्नागिरी २४, जोरदार, अजिता, इंद्रायणी, तुळशी आदी जातीच्या बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी पीक घेतले आहे.
शिराळा तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा जादा पाऊस पडला. तालुक्यात खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक घेतले जाते. कोकण भाग सोडला तर इतर भागात धूळवाफ पेरण्या होतात. परंतु, या वर्षी पावसाने मे महिन्यातच सुरुवात केल्याने सर्वत्र भात पिकाची रोप लागण करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्यादा कष्ट घ्यावे लागले.
या वर्षी भात पिकाची रोप लागण करावी लागल्यामुळे जादा मजुरांचा वापर करावा लागला. शिवाय मागास झालेल्या पिकाचे संगोपन करण्यासाठी जास्त खर्चही करावा लागला. अनेक शेतकऱ्यांना भात रोपे विकत आणावी लागली. त्यामुळे भाताच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. तालुक्याचा पश्चिम भाग हा भाताचे आगर म्हणून ओळखला जातो. या वर्षी मागास असलेल्या भात पिकाला चांगल्या लोंब्या पडलेल्या पाहावयास मिळत आहे.
या वर्षी मी वीस गुंठे शेतात भाताची आगाप पेरणी केली. पिकाचे चांगले संगोपन केले. या शेतातून मला ३० पोती भात उत्पादन झाले आहे. - सोपान साळुंखे, प्रगतशील शेतकरी, ढोलेवाडी.