रमेश वारके
बोरवडे : सध्या भातकापणीचा हंगाम जोमात सुरू असून, शेतमजुरांच्या कमतरतेमुळे कापणीला विलंब होत आहे.
या समस्येवर मात करत कागल तालुक्यातील बोरवडे येथील युवराज आणि रवींद्र पांडुरंग साठे या दोन भावांनी देशी जुगाड करून अवघ्या १६ हजारात भात मळणी मशीन बनवले आहे.
या मशीनने एक लिटर पेट्रोल खर्चात म्हणजे फक्त शंभर रुपयांत १० पोती भाताची मळणी केवळ एक तासात होत आहे.
या अडचणीचा विचार करून युवराज आणि रवींद्र साठे यांनी अनोखे भात मळणी मशीन बनवले आहे. यासाठी त्यांनी पत्र्याचे रिकामे बॅरेल घेऊन त्याला आतून लोखंडी पट्टी आणि लाकडी फळी बसवली आहे.
या यंत्राला पट्ट्याच्या साहाय्याने साडेसहा एचपीची मोटर जोडली आहे. हे यंत्र पेट्रोलवर चालत असून एक तासात केवळ एक लिटर पेट्रोलमध्ये १० पोती भाताची मळणी होते.
या कामासाठी केवळ तीन ते चार लोकांची गरज असून दिवसभरात दोन ते तीन एकर भाताची मळणी शक्य होते. युवराज व रवींद्र यांनी स्वतःच्या कल्पनेने या मशीनची निर्मिती केली आहे.
भात पिकाची कापणी करताना मजूर मिळत नाहीत ही मोठी समस्या आहे. शिवाय भात कापणीचे मोठे मशीन अडचणीच्या शिवारात नेता येत नसल्याने आपल्याला हे यंत्र बनविण्याचे सुचले. केवळ १६ हजार रुपयांत आपण हे यंत्र बनवले आहे. शंभर पोती भात या मशीनने मळले आहे. - रवींद्र साठे, मशीनमालक शेतकरी
अधिक वाचा: कोल्हापूर जिल्ह्यातील अजून दोन कारखान्यांनी केली सुधारित ऊस दराची घोषणा; काय दिला दर?
