सोलापूर : अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई म्हणून जिल्ह्याला आतापर्यंत १५७९ कोटी ३७ लाख रुपये मंजूर आहेत.
आता केवळ खरडून गेलेल्या जमिनीचा व ऑगस्ट महिन्यातील दोन हेक्टरवरील क्षेत्राची रक्कम मंजूर आदेश निघालेला नाही. दरम्यान, आतापर्यंत ४०९ कोटी २० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असल्याचे सांगण्यात आले.
ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. सप्टेंबर महिन्यात तर जिल्ह्यात उच्चांकी पाऊस पडला. कोणतेही मंडल अथवा मंडळातील गाव नुकसानीपासून वाचू शकले नाही.
पावसाळा संपल्यानंतर पीक नुकसानीची दाहकता समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यात बीड, धाराशिव व अहिल्यानगर जिल्ह्यात पडलेल्या अति पावसाने जिल्ह्यातील सीना व इतर नद्यांना आलेल्या पुराची झळ संपूर्ण पिकांना बसली.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीची जिल्ह्याला चार आदेशान्वये रक्कम मंजूर झाली आहे. ती एकूण रक्कम १५७९ कोटी ३७ लाख रुपये इतकी आहे.
केवळ खरडून गेलेल्या जमिनीची रक्कम बाकी
◼️ सप्टेंबर महिन्यात पूर व अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीसाठी सात लाख ६४ हजार शेतकऱ्यांना ८६७ कोटी ३८ लाख रुपये मंजूर आहेत. त्यापैकी तीन लाख ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४०९ कोटी २० लाख रुपये जमा झाले आहेत.
◼️ मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ३२ हजार ४४० शेतकऱ्यांच्या २१ हजार ९८९ हेक्टर पिकांचे ४० कोटी ४३ लाख ४६ हजार रुपये मंजूर झाले व ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.
◼️ ऑगस्ट महिन्यात तीन हजार ९३० शेतकऱ्यांच्या चार हजार ७४८ शेतकऱ्यांच्या चार कोटी रुपये मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
◼️ माती, गाळ साचून जमीन खराब झाल्याने तसेच जमीन खरडून गेल्याने नुकसान झालेल्या १७ हजार शेतकऱ्यांच्या बारा हजार हेक्टरचे ५४ कोटी ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट व माळशिरस तालुक्याची आकडेवारी आली नसल्याने रक्कम मंजूर झालेली नाही.
अधिक वाचा: मागील हंगामातील ऊस बिलाची रक्कम न दिल्याने 'या' तीन कारखान्यांचे गाळप परवाने नाकारले
